Tue, Mar 26, 2019 23:56होमपेज › Pune › माळीणच्या आठवणीने ग्रामस्थ गहिवरले

माळीणच्या आठवणीने ग्रामस्थ गहिवरले

Published On: Jul 31 2018 1:43AM | Last Updated: Jul 31 2018 12:50AMभीमाशंकर ः वार्ताहर

माळीण (ता. आंबेगाव) येथील दुर्घटनेला सोमवारी (दि.30) चार वर्षे पूर्ण झाली. चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मृतांच्या आठवणीने कुटुंबातील मुली, मुले व नातेवाईक यांचे हृदय गहिवरून आले होते. दुर्घटना झालेल्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाला पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,  माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष मोरमारे, बाजार समिती सभापती देवदत्त निकम, गटविकास अधिकारी राहुल काळभोर व ग्रामस्थांच्या हस्ते सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.   

या वेळी सभापती उषा कानडे, उपसभापती नंदकुमार सोनावले, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष मधुकर बोर्‍हाडे, पंचायत समितीचे सदस्य संजय गवारी, इंदूबाई लोहकरे, माजी सभापती प्रकाश घोलप, जिल्हा परिषद सदस्या रूपाली जगदाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एल. टी. डाके, शाखा अभियंता एस. आर. थडकर, गोरक्षनाथ आगळे, मंडल अधिकारी एस. एम. पवार, तलाठी गव्हाणे, माळीण सरपंच हौसाबाई आसवले, ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संखेने उपस्थित होते.   

माळीण येथे स्मिृतस्तंभाजवळ मृतांना श्रद्धांजली वाहताना महिला व मुलींचे हृदय भरून आलेले दिसत होते. मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांसह नातेवाइकांनी गर्दी केली होती. श्रद्धांजली कार्यक्रमात अनेक ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन सध्याच्या नवीन कामाबाबत काही मागण्या व आपली मते व्यक्त केली. स्मृतिवनातील स्तंभ खराब होऊ नये म्हणून पत्राशेडचा मोठा सभामंडप बांधून मिळावा अशी मागणी करण्यात आली. तसेच पुनर्वसित माळीण गावठाणाच्या घरांच्या गळतीची व दुरुस्तीची कामे लवकर पूर्ण करावीत; तसेच माळीण गावाला पिण्याच्या पाण्याची असणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी करून झालेल्या कामांबाबत ग्रामस्थांकडून प्रशासनाचे आभार मानण्यात आले. देवराम झांजरे, सुहास झांजरे,  सावळेराम लेंभे आदींनी मनोगतात मागणी केली.   

उर्वरित कामे पूर्ण करणार : विवेक वळसे पाटील

या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील म्हणाले, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मदत व पुनर्वसनाच्या कामासाठी आजपर्यंत निधी कमी पडला नाही. यामुळे कमी कालावधीत पुनर्वसनाची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच अजून माळीण ग्रामस्थांनी सुचवलेली कामे पूर्ण करण्यात येतील.

आम्ही माळीणवासीयांच्या मागे भक्कमपणे उभे आहोत. माळीणसाठी केलेल्या मदतकार्यात कोणतीही तक्रार ग्रामस्थांकडून व इतर कोणाकडून आलेली नाही, ही बाब प्रशासनासाठी कौतुकास्पद आहे. 

माळीण पुनर्वसनाच्या कामात पावसामुळे काही प्रमाणात त्रुटी जाणवल्या आहेत. यात घरांची गळती; तसेच शेताकडे जुन्या गावठाण ठिकाणी जा-ये करण्यासाठी नवीन गावठाणापासून कमी अंतराचा पाणंद रस्ता सर्व्हे करून लवकरच केला जाणार आहे व चिंचेचीवाडी रस्त्याला साकव पूल बांधून लवकरच पूर्ण होईल. पसारवाडी, कोकणेवाडीमार्गे जुन्नरला जाणारा जोडरस्ता लवकरच पक्का केला जाईल;  तसेच अपूर्ण मागण्या व आवश्यक सुविधा यासाठी जिल्हा परिषद व सार्वजनिक बाधकाम विभाग ही कामे पूर्ण करतील, असे आश्‍वासन वळसे-पाटील यांनी दिले. या वेळी आलेल्या मान्यवरांनी चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त  श्रद्धांजली वाहिली.