Tue, May 21, 2019 04:05होमपेज › Pune › अस्वच्छ भाज्यांनी आरोग्य धोक्यात

अस्वच्छ भाज्यांनी आरोग्य धोक्यात

Published On: Jun 25 2018 1:51AM | Last Updated: Jun 25 2018 12:48AMपुणे : शंकर कवडे

शहरात पावसाला सुरवात झाली असून, पावसाळी कामे पूर्ण न झाल्याने येत्या काळात पुणेकरांच्या ताटात अस्वच्छ भाज्यांचा शिरकाव होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मार्केट यार्डातील घाऊक भाजीपाला बाजारात पाणी वाहून नेणारी गटारे ऐन पावसाळ्यात राडारोड्याने तुंबलेली आहेत. याखेरीज, उघड्यावरील साचलेल्या डबक्यांमध्ये डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. गटारांमधील तसेच उघड्यावरील कचर्‍यामधून वाहणारे पाणीही रस्त्यावर येऊन विक्रीसाठी आलेल्या भाज्यांच्या संपर्कात येऊन, त्या दूषित होण्याची स्थिती दिसून येत आहे. पावसाळ्यापुर्वीच्या कामाचा निपटारा वेळेत पूर्ण न केल्याचा फटका पुणेकर ग्राहकांना बसून आरोग्याचा गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

सध्यस्थितीत बाजार आवारात बहुतांश ड्रेनेजमध्ये हॉटेलव्यावसायिकांनी टाकलेला राडारोडा, माती तसेच कचरा अडकल्याने मोठ्या प्रमाणात घाण साठली आहे. या गटारांची स्वच्छता होणे आवश्यक होते. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने चांगला पाऊस झाल्यास याठिकाणी पाणी तुंबून, ते इतर गाळ्यांमध्ये शिरण्याची शक्यता आहे. 

बाजाराच्या गेट क्रं. 4 च्या बाजूस बाजार समितीची मोकळ्या जागेनजिकझोपडपट्टी आहे. याठिकाणचा वापर सार्वजनिक स्वच्छतागृहासारखा होतो. त्यामुळे, पावसाला सुरवात झाल्यास, येत्या काही दिवसांमध्ये येथून वाहणारे सर्व पाणी आवारातील कांदा बटाटा व तरकारी विभागात येणार आहे. कांदा बटाटा वगळता तरकारी व फळ विभागात मोठ्या प्रमाणात माल हा 15 फुटांपर्यंतच्या गाळ्याच्या बाहेर रस्त्यावर लावण्यात येतो. बाजाराच्या गेट नं. 4 जवळ उतार असल्याने मोठ्या प्रमाणात आलेला दूषित पाण्याचा लोंढा हा तरकारी विभागात येतो. या पाण्यामुळे भाजीपाला दूषित होण्याची भीती आहे.

याखेरीज, उघड्यावर टाकलेल्या कचरा आणि साठलेल्या पाण्यामध्ये डुकरे मोकाट फिरत असून, मोठा पाऊस झाल्यास यातून वाहणारे पाणीही येथेच येणार आहे. मार्केटयार्डातून किरकोळ विक्रेते, विविध कंपन्या व केटरर्स यांमार्फत मोठ्या प्रमाणात तरकारींची खरेदी करण्यात येते. किरकोळ विक्रेत्यांकडून तोच भाजीपाला घरगुती ग्राहक खरेदी करतात. त्यामुळे, येत्या काही दिवसांत पुणेकरांच्या ताटात अस्वच्छ भाज्यांचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.