Thu, Apr 25, 2019 12:24होमपेज › Pune › पुणे : लोणी काळभोरला विद्यार्थिनींची कपडे काढून तपासणी

पुणे : विद्यार्थिनींची कपडे काढून तपासणी

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 04 2018 1:40AMलोणी काळभोर  : प्रतिनिधी 

सध्या सुरू असलेल्या दहावी व बारावी शालांत परीक्षेत येथील एम. आय. टी. कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर कॉपीच्या संशयाने परीक्षा देणार्‍या मुलींचे कपडे उतरवण्याचा प्रकार तेथील शिक्षक व कर्मचार्‍यांनी केला. परिणामी पालकवर्गात संताप व्यक्त होत असून, पालकांसह ग्रामस्थ लोणी काळभोर पोलिस ठाण्यात कारवाईसाठी शनिवारी (दि. 3) दिवसभर ठाण मांडून बसले होते. अखेर संस्थेच्या कर्मचार्‍यांवर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

राज्य परीक्षा मंडळातर्फे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असून हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील एम. आय. टी. कॉलेजमध्ये परीक्षा केंद्र आहे. या परीक्षा केंद्रावर पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी येत आहेत. 21 फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून या केंद्रावर येथील शिक्षक व कर्मचारी यांनी परीक्षेला बसण्यापूर्वी मुलींची तपासणी करण्याचे काम सुरू केले. वास्तविक येथील कोणालाच कॉपी तपासणी करण्याचा अधिकार नाही. फक्त बोर्डाच्या पथकालाच तपासणी करण्याचा अधिकार आहे, तरी देखील हे काम या संस्थेच्या कर्मचार्‍यांनी केले. 

या मुलींनी हा प्रकार अनेक दिवस सहन केला व आता सहन होत नसल्याने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. संतप्त झालेल्या पालकांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेतली. या वेळी गावात हा प्रकार समजताच ग्रामस्थांसह लोणी काळभोरच्या सरपंच वंदना काळभोर, उपसरपंच योगेश काळभोर, हवेली खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रशांत काळभोर, पंचायत समिती सदस्य सीना काळभोर हे आले.  

या वेळी हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास गरूड, पोलिस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांच्याबरोबर बैठक होऊन झालेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला व तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या परीक्षा केंद्रावर तत्काळ पोलिस बंदोबस्त देण्याचे आदेश सुहास गरूड यांनी दिले. त्यानंतर पोलिस ठाण्यात संस्थेच्या कर्मचारी व शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन परीक्षा मंडळाने शिक्षणाधिकार्‍यांच्या  पथकाला लोणी काळभोरला पाठवले असून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

दरम्यान, खासदार शिवाजीराव आढळराव यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला व संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्याला तत्काळ भेट दिली व या घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. लोणी काळभोरच्या सरपंच वंदना काळभोर यांनी या विद्यार्थिनींच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले.

सर्व आरोप बिनबुडाचे : प्राचार्य बावस्कर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची तर शिक्षिकांनी विद्यार्थीनींची केवळ वर-वर तपासणी केली. महत्त्वाचे म्हणजे बहुतांश विद्यार्थी कॉप्या घेऊन येत असल्याने त्या सर्व कॉप्या पोलिस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत. कोणत्याही विद्यार्थिनीची कपडे काढून तपासणी करण्यात आलेली नाही. ज्या मुलीने ही तक्रार केली आहे तिच्याकडे कॉपी होती. त्यामुळे महाविद्यालयाला बदनाम करण्यासाठी हे बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती उपशिक्षणाधिकारी पारधी यांना दिल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य व केंद्र प्रमुख वीरेंद्र बावस्कर यांनी सांगितले.

महाविद्यालयाच्या बदनामीचे षडयंत्र : स्वाती चाटे

परीक्षेपूर्वी केवळ दहा मिनिटांचा अवधी विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी मिळतो. यामध्ये परीक्षेला असलेल्या 260 विद्यार्थ्यांची तपासणी शक्यच नाही. यावर्षी पहिल्यांदाच या केंद्रावर परीक्षा होत आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाच्या नियमानुसार येथे कॉप्या करू दिल्या जात नाही. त्यामुळे महाविद्यालयाला बदनाम करण्यासाठी रचलेले हे षडयंत्र असल्याचे एमआयटीच्या कार्यकारी संचालक स्वाती चाटे यांनी सांगितले.

प्रकरणाची चौकशी करणार

लोणी काळभोर येथे घडलेला प्रकार अयोग्य आहे. कॉपी होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांची झडती घ्यावी , पण असे प्रकार म्हणजे लाजीरवाणी बाब असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.        - शकुंतला काळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ