Tue, Jul 16, 2019 13:36होमपेज › Pune › दुचाकीस्वारांनी कार अडवून दाम्पत्याला लुटले

दुचाकीस्वारांनी कार अडवून दाम्पत्याला लुटले

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 1:20AMपुणे : प्रतिनिधी

कात्रज घाटात दोन दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी दाम्पत्याची कार अडवून गळ्याला घातक शस्त्र लावून  दोन लाखांचे दागिने लुटल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला. या घटनेत महिला किरकोळ जखमी झाली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यातच नवीन कात्रज बोगद्याजवळ दुचाकीस्वार दाम्पत्याच्या गळ्यातील सोने लंपास केल्याची घटना घडली होती.  याप्रकरणी दिलीप शिवराम भोसले (52, रा. मु.पो. विंझर, ता. वेल्हा) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन दुचाकीवर आलेल्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप भोसले हे स्वारगेट एस.डी.डेपोत वाहक आहेत. ते राहण्यास वेल्हा तालुक्यातील विंझर येथे आहेत. सोमवारी हडपसर येथे मित्राच्या घरी कार्यक्रमासाठी कारने पत्नीसह सायंकाळी पाच वाजता आले होते. तो कार्यक्रम संपवून ते शिवाजीनगर येथे पत्नीच्या लहान भावाच्या घरी गेले. तेथून ते रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास परत त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी निघाले. ते कात्रज घाटात सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास आले. त्यांची कार चेकपोस्ट जवळील रमाकांत इलेक्ट्रिक बोर्डच्या समोर आल्यानंतर दुचाकीवर आलेल्या तिघांनी कारसमोर दुचाकी लावून कार अडविली. तर, पाठीमागून आणखी एका दुचाकीवर दोघे आले. 

त्यातील एकाने घाबरू नका, आम्ही पोलिस मित्र आहोत, अशी बतावणी केली. त्याचवेळी दुसरा लुटारू पत्नी बसलेल्या कारच्या दरवाजा जवळ आला. त्याने दरवाजा उघडण्याच्या प्रयत्न केला. परंतु, दरवाजा न उघडल्याने दरवाजावर लाथ मारूत तो दरवाजा उघडला आणि धारदार शस्त्र  फिर्यादींच्या पत्नीच्या गळ्याला लावले.  ’आवाज करायचा नाही, आरडाओरडा करायचा नाही, नाही तर गळा चिरून टाकीन,’अशी धमकी देत केस ओढून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे नेकलेस व गंठण असे एकूण 1 लाख 87 हजार रुपयांचे दागिने काढून घेतले. यात फिर्यादींच्या पत्नीला गळ्याभोवती  हत्याराची जखम झाली. त्यादरम्यान इतरांनी फिर्यादींना कारच्या बाहेर धमकावून काढले. तसेच, त्यांच्या खिशातील पाकिटातून 10 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांना कारमध्ये बसून पाठीमागे न बघता कार घेऊन येथून जा, अशी धमकी दिली. त्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अधिक तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.