Mon, Apr 22, 2019 01:43होमपेज › Pune › मुठा नदीमध्ये ट्रक कोसळला

मुठा नदीमध्ये ट्रक कोसळला

Published On: Jul 22 2018 12:59AM | Last Updated: Jul 22 2018 12:48AMपुणे : प्रतिनिधी

भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने शिवाजीनगर येथील कामगार पुतळा परिसरातील जुन्या संगम पुलाचा कठडा तोडून ट्रक मुठा नदीत कोसळल्याची घटना शनिवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात ट्रक चालक व क्लीनर जागीच ठार झाले आहेत. चालक चंद्रकांत शिवण्णा पुजारी (22), क्‍लीनर संतोष विठ्ठल हेबाळे (21, दोघेही रा. गुलबर्गा, कर्नाटक) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक लोणीकाळभोर येथील विजय गायकवाड यांचा आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास अग्निशमन दलाला अपघात झाल्याचा कॉल आल्यावर जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. चालक चंद्रकांत पुजारी हा अलिबाग येथून कोलकाताकडे लोखंडाची भुकटी घेऊन जात होता. शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास तो शिवाजीनगर येथून कामगार पुतळ्याजवळील रस्त्यावरून जुन्या बाजारकडे भरधाव जात होता.

त्यावेळी जुन्या संगम पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या वस्तीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने याची खबर अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे जवान शिड्या लावून नदी पात्रात उतरले. नदीपात्रात  ट्रक उलटा झाला होता, तर केबिनमध्ये चालक आणि क्‍लीनर दोघेही अडकून पडले होते. यामुळे जवानांनी तातडीने बचाव कार्य हाती घेतले. क्रेनच्या साहाय्याने ट्रक सरळ करून केबिनमधील एकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, केबिन चेपल्याने कटरच्या साहाय्याने कापून मृतदेह बाहेर काढावा लागला. 

ट्रक नदीच्या गाळात अडकून पडल्याने दुसरा मृतदेह काढण्यास अडचणी येत होत्या. यामुळे जादा क्षमतेची क्रेन मागवून ट्रक थोडा उचलण्यात आला. यानंतर दुसरा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. ट्रक 16 चाकी व जादा क्षमतेचा असल्याने त्याला नदीपात्रातून बाहेर काढण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरू होते. नदीतील गाळात ट्रक रुतल्याने जादा क्षमतेच्या क्रेनने केबिनचा भाग उचलून चालक, क्‍लीनरला बाहेर काढण्यात आले. मात्र, अपघातात या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद केली असल्याचे शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे अप्पासाहेब वाघमळे यांनी सांगितले. 

अपघातानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तसेच, सुभाषचंद्र बोस (संचेती चौक) चौकातून येणारी वाहने कामगार पुतळा येथून कुंभारवाडा मार्गे वळविण्यात आली होती. परिणामी, डेंगळे पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघात झाल्यानंतर येथील पुलासह रेल्वेच्या पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पुलाचा कठडा तुटला असल्याने पुढील काही दिवस हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.