Fri, Jul 19, 2019 22:10होमपेज › Pune › सॅनिटरी नॅपकीन्स वापरण्याचा कचरावेचक महिलांनी केला निर्धार 

सॅनिटरी नॅपकीन्स वापरण्याचा कचरावेचक महिलांनी केला निर्धार 

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 17 2018 1:23AMपिंपरी : प्रतिनिधी 

‘पॅडमॅन’ चित्रपटातून दाखविण्यात आलेल्या मासिक पाळीविषयीच्या समस्या आणि संसर्ग यातून बोध घेऊन कचरावेचक महिलांनी स्वत: आणि स्वत:च्या मुलींना देखील सॅनिटरी नॅपकीन्स वापरण्याचानिर्धार केला.

सध्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटातून महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन्स  किती महत्त्वाचे आहे यावर प्रकाशझोत टाकला जात आहे. सर्वचस्तरातून या चित्रपटाचे कौतुक होत आहे. समाजातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत मासिक पाळीतील स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी यासाठी कागद, काच, कचरा कष्टकरी पंचायत संघटनेतर्फे शहरातील कचरावेक आणि त्यांच्या पन्नास मुले आणि मुली यांना पॅडमॅन हा चित्रपट दाखविण्यात आला. 

आजही देशामध्ये मासिक पाळीविषयी विचित्र रुढी आणि परंपरा आहेत. जसे मासिक पाळी आल्यानंतर महिलांना चार दिवस जननेद्रिंयांची स्वच्छता करू नये. नाही तर पुढे जाऊन ती वांझ बनते; तसेच काही ठिकाणी मासिक पाळी आल्यानंतर महिलांना वेगळे ठेवले जाते. 

आजच्या काळात केवळ अशिक्षित नाही तर शिक्षित महिला, त्यांचे पती भाऊ, वडील यांच्यातही याबाबत जागृती, मोकळा संवाद होणे गरजे आहे, हे चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्यात आले आहे. 
सध्या महिला घराबाहेर पडू लागल्या आहेत. त्यामुळे अशा प्रथांचे प्रमाण कमी झाले असले, तरी यामागे असलेल्या अंधश्रद्धा मात्र कायम आहेत. त्या दूर करण्यात चित्रपटाने महत्त्वाचे काम केले आहे. आम्हालाही मासिक पाळीत स्वच्छत किती महत्त्वाची आहे हे समजले, अशा भावना कचरावेचक महिलांनी व्यक्त केल्या. 

मासिक पाळीवर पहिल्यांदाच अशा प्रकारचा चित्रपट निघतो हे आम्हाला खूप आवडले. त्यात मासिक पाळीविषयी दाखविलेले गैरसमज आजही तसेच आहेत. आम्ही देखील आमच्या घरातील आणि नातेवाइकांच्या मुलींना पॅड वापरण्यास सांगणार आहोत. चार पैसे गेले तरी चालतील; पण आरोग्याच्या दृष्टीने घातक असे काही उपाय करणार नाही. चित्रपटातून आम्हाला चांगले शिकण्यास मिळाले.     -सुरेखा म्हस्के (कचरावेचक महिला) 

महिलांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुलभ असे सॅनिटरी नॅपकीन वापरा म्हणून प्रोत्साहित करण्याचे काम जोमात सुरू आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र, सॅनिटरी नॅपकीन्सच्या कचर्‍यास काहीतरी ओळख (चिन्ह) असावी. म्हणजे कचरा वेगळा करताना सॅनिटरी नॅपकीन्स कशामध्ये आहे हे कळेल आणि तो व्यवस्थित हाताळला जाईल आणि आमचेही आरोग्य चांगले राहील.    -जयश्री शिंदे (कचरावेचक महिला)