Thu, Aug 22, 2019 14:34होमपेज › Pune › ‘बँकां’चे व्यवहार निवडणूक आयोगाच्या ‘रडार’वर

‘बँकां’चे व्यवहार निवडणूक आयोगाच्या ‘रडार’वर

Published On: Apr 19 2019 1:52AM | Last Updated: Apr 19 2019 1:52AM
 पुणे : प्रतिनिधी 

निवडणुकीच्या काळात खात्यांमध्ये होणार्‍या संशयित व्यवहाराची माहिती बँकांनी निवडणूक आयोगाला कळविणे सक्‍तीचे आहे. मात्र, ज्या बँकांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे, अशा बँका निवडणूक आयोगाच्या रडारवर आहेत. 

17 व्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला हळूहळू वेग वाढला आहे. दि. 23 एप्रिल रोजी पुणे आणि बारामती मतदारसंघासाठी मतदान होत आहे, तर 29 एप्रिलला शिरूर आणि मावळकरिता मतदान होत आहे. निवडणूक काळात काळ्या पैशांचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोग व  आयकर विभागाने कंबर कसली आहे. मतदारसंघात होणार्‍या मोठ्या आर्थिक व्यवहारांवर विभागाची करडी नजर राहणार आहे. काळा पैसा शोधण्यासाठी आयकर विभागाने शीघ्रकृती पथकही तयार केले आहे, तर दुसरीकडे संशयित खात्यांमध्ये होणार्‍या व्यवहारांची माहिती बँकांना दररोज निवडणूक आयोगाकडे देण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती प्रशासनातील अधिकार्‍यांनी ‘पुढारी’शी 
बोलताना सांगितली. 

 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात आयकर विभागाने राज्यात 6 कोटी रुपये काळा पैसा जप्‍त केला होता. काळा पैसा शोधण्यासाठी आयकर विभागाच्याही रडारवर बँका आहेत. निवडणूक लढविणारे उमेदवार व त्यांच्या नातेवाइकांच्या खात्यावर लक्ष ठेवणे. याशिवाय कोणत्याही बँकांमधील खात्यात मोठ्या रकमेचा भरणा किंवा रक्‍कम काढण्यात आली असेल. ज्या खात्यात व्यवहार होत नाही; पण अचानक निवडणूक काळात या खात्यात लाखो रुपये जमा झाले असतील, तर असे व्यवहार पारखण्यात येत आहेत.

शेवटच्या पाच दिवसांमुळे कडक ‘वॉच’ 

सर्व संशयित खात्यांची माहिती बँकांना दररोज संध्याकाळी निवडणूक आयोगाला द्यावी लागत आहे. मात्र, या आदेशाकडे काही बँकांनी दुर्लक्ष केले होते. यानंतर बँकनिहाय अहवाल मागविण्यात आला. ज्या बँका दररोज अहवाल सादर करीत नाहीत, त्यांना अधिकार्‍यांनी तंबी दिली; तसेच निवडणूक आयोगाचा आदेश मानला नाही, तर बँकांवर काय कारवाई होऊ शकते, याची माहितीही संबंधितांना देण्यात आली. मतदानाला केवळ पाच दिवस राहिल्यामुळे यंत्रणा अधिक सक्रिय झाली आहे.