Mon, Mar 25, 2019 13:13होमपेज › Pune › रेल्वेची ‘बूट लाँड्री’ वर्षाखेरीस सुरू होणार

रेल्वेची ‘बूट लाँड्री’ वर्षाखेरीस सुरू होणार

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 1:27AMपुणे : निमिष गोखले 

रेल्वेतील लिनेन (बेडशीट्स, चादरी, ब्लँकेट, उशीचे आभरे) धुणारी आधुनिक लाँड्री घोरपडी येथे उभारण्यात येत आहे. पूर्णतः यांत्रिक पद्धतीची (मॅकेनाइज्ड) ही लाँड्री असून वर्षअखेरीस ती सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही लाँड्री बूट (बिल्ड ओन ऑपरेट ट्रान्स्पोर्ट) धर्तीवर सुरू होणार असून स्वीस टेक्नॉलॉजी वापरण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. पुणे विभागातून चालविण्यात येणार्‍या सर्व गाड्यांची लिनेन येथे धुण्यात येणार असून रेल्वे प्रवाशांना स्वच्छ प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. 

रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधील प्रवाशांना लिनेन पुरविण्यात येते. मात्र, बहुतांश वेळा लिनेन नीट न धुतल्यामुळे त्याला कुबट वास येतो. त्याचप्रमाणे त्या मळकटदेखील दिसतात. मात्र, या लाँड्रीमुळे यात आमूलाग्र सुधारणा होणार असून कळकट उशीचे आभरे, ब्लँकेटपासून प्रवाशांची सुटका होणार आहे. यापूर्वी पुणे विभागातून धावणार्‍या रेल्वेंचे लिनेन मुंबईत धुण्यात येत होते. त्याचप्रमाणे तळेगाव येथील एका खासगी ठेकेदाराला स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, स्वच्छतेचा अतिरिक्त भार पडल्याने बहुतांश वेळा ब्लँकेट, चादरी नीट व वेळेत धुवून व्हायच्या नाहीत. 

दरम्यान, घोरपडी यार्डातील पोस्ट मेन्टेनन्स कॉम्प्लेक्स येथे ही आधुनिक लाँड्री उभारली जात असून त्याचे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत ती सुरू होणार असून, 10 हजार स्क्‍वेअर फूट अशा प्रशस्त जागेत ती उभारली जाणार आहे. दहा वर्षांच्या लीजवर रेल्वेने कंत्राटदाराला नाममात्र दरात जागा पुरवली आहे. यंत्रसामग्री, वीज कंत्राटदार स्वतःची वापरणार असून 24 तासांत सुमारे 11 टन लिनेन धुवून मिळतील, अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली.