Fri, Feb 22, 2019 18:01होमपेज › Pune › रुग्णवाहिकेचा चालक नसल्याने रुग्णावर गंभीर प्रसंग ओढवण्याची वेळ

रुग्णवाहिकेचा चालक नसल्याने रुग्णावर गंभीर प्रसंग ओढवण्याची वेळ

Published On: May 18 2018 1:32AM | Last Updated: May 18 2018 12:36AMखडकी : वार्ताहर 

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये ‘डायल 108’ या  रुग्णवाहिकेवरील चालक अनेकवेळा उपस्थित नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. अनेक वेळा रुग्णांना तातडीने अन्य रुग्णालयांमध्ये हलविण्याची वेळ आल्यास चालक उपलब्ध नसल्याने रुग्णांची तसेच नातेवाईकांची मोठी तारांबळ उडत आहे. प्रसंगी रुग्णांच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नसून प्रशासनाने याबाबत गंभीर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत खडकी येथील रहिवासी व्यक्त करीत आहेत.

बोर्डाच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयामध्ये एक गर्भवती महिला उपचारासाठी दाखल झाली होती. महिलेची प्रकृती पाहता तिला अतिदक्षता विभागातील डॉक्टरने अन्य रुग्णालयामध्ये हलविण्याचा निर्णय घेतला. दुसर्‍या रुग्णालयामध्ये हलविण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज होती. मात्र तेथील 108 रुग्णवाहिकेचा चालक गायब असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. याप्रकरणी दै. पुढारीचे प्रतिनिधी यांनी रुग्णालय प्रशासनाचे प्रभारी डॉ. सुरेंद्र भेंडे यांच्याशी तातडीने संपर्क साधून गर्भवती महिलेची नाजूक परिस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानंतर भेंडे यांनी डॉक्टरांना तातडीने चालकाला संपर्क करण्याचे आदेश दिले. दरम्यान चालकाला शोधण्यासाठी तब्बल अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागला.

यांनतर 108 रुग्णवाहिकेचा चालक आल्यावर गर्भवतीला घेउन रुग्णवाहिका निघाली, मात्र रुग्णालयाच्या समोर प्रचंड कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकली. वाहनांच्या गर्दीतून रुग्णवाहिकेला  सामाजिक कार्यकर्ते किरण जाधव तसेच रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनी वाट मोकळी करून दिल्यावर रुग्णवाहिका मार्गस्थ झाली. बोर्ड प्रशासनाकडे तीन रुग्णवाहिका असून एक रुग्णवाहिका यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये रुग्णाला घेऊन गेली होती, तर 108 रुग्णवाहिकेचा चालक गायब होता. त्यामुळे त्या गर्भवती महिलेवर बिकट प्रसंग ओढवला. खडकी बोर्ड प्रशासनाकडे दोन रुग्णवाहिका कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने सुरू आहेत. मात्र आता प्रशासनाने रूरुग्णवाहिका तयार केल्या आहेत. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट पध्दतीतील रुग्णवाहिका काढून टाकण्यात येणार असल्याचे बोर्डाचे उपाध्यक्ष अभय सावंत यांनी सांगितले. रुग्णवाहिकांवर तीन पाळ्यांमध्ये चालक उपस्थित राहणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.