Thu, Mar 21, 2019 16:02होमपेज › Pune › गृह खात्याची लक्तरे पुन्हा वेशीवर

गृह खात्याची लक्तरे पुन्हा वेशीवर

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 29 2018 1:17AMपुणे : देवेंद्र जैन 

राज्य पोलिस दलातील अस्थापना विभागाने पोलिस दलाची अब्रू पुन्हा चव्हाट्यावर आणली आहे. पुणे रेल्वे पोलिस दलात वरिष्ठावर कनिष्ठ अधिकार्‍याला सलाम ठोकण्याची वेळ आली आहे. यापूर्वीही पुणे रेल्वे पोलिस दलात असाच प्रकार घडला होता.

पुणे रेल्वे पोलिस दलात सद्यस्थितीत नियुक्‍त केलेले अधीक्षक हे फौजदार म्हणून पोलिस खात्यात भरती झाले व वेळोवेळी  मिळालेल्या पदोन्नतीमुळे ते या पदावर पोहोचले आहेत. पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांना 2009 ची बॅच देण्यात आली; पण 2007 साली ज्यांची थेट पोलिस उपअधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली, तो अधिकारी सध्या रेल्वेत कार्यरत आहे. गेल्या 8 ऑगस्टला झालेल्या बदल्यांवेळी  त्या पोलिस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली या अधिकार्‍याला नेमण्यात आले आहे. 

पुणे शहराचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस आयुक्त के. वेंकटेशन यांनी 4 ऑगस्ट रोजी शहरात नवीन आलेल्या उपायुक्तांना नेमणुका दिल्या; त्यात या अधिकार्‍याला आहे त्या ठिकाणीच नेमण्यात आले, पण राज्य सरकारने 8 ऑगस्ट रोजी केलेल्या बदल्यांच्या यादीत या अधिकार्‍याला रेल्वे अधीक्षक म्हणून पाठवले; तसेच ज्या महिला उपायुक्तांची बदली पुणे येथे झाली त्यांना पुणे आयुक्तालय येथे बदलण्यात आले.   

आस्थापना विभागाला जेव्हा त्यांची चूक लक्षात आली तेव्हा त्या महिला अधिकार्‍याला कार्यरत असलेल्या ठिकाणावरून न सोडण्याचे आदेश तेथील अधीक्षकांना देण्यात आले, पण हा आदेश कोणी दिला हे अद्याप गुलदस्त्यात आहे.  गृहखाते आणि आस्थापना विभागाच्या मनमानीमुळे आणि ज्येष्ठ - कनिष्ठ वादात काम करणार्‍या अधिकार्‍यांवरही परिणाम होत आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांची इंजिन मागे आणि बोगी पुढे अशी अवस्था झाली आहे. याचा फटका या महिला पोलिस उपायुक्तांनाही बसला आहे. अशा अनेक नेमणुकांच्या घोळामुळे कार्यक्षम पोलिस अधिकारी नाराज होत असल्याचे कळते व त्यामुळे त्याचा परिणाम सामान्य माणसाच्या तक्रारींवर होत आहे. ‘पुढारी’ प्रतिनिधीच्या सदर बातमीची कुणकुण गृह व आस्थापना शाखेला सकाळीच आली होती, त्यामुळे अब्रूचे धिंडवडे निघण्याआधीच सायंकाळी सदर अधिकार्‍याची राज्य गुन्हे अण्वेषण विभागात अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे खात्रीलायकपणे समजले आहे. त्यामुळे कर्तबगार महिला उपायुक्तांचा पुणे आयुक्तालयात प्रवेश निश्चित मानला जात आहे.