होमपेज › Pune › भ्रष्टाचाराच्या प्रकरणात प्रधान सचिवांची साक्ष

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात प्रधान सचिवांची साक्ष

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 22 2018 12:30AMपुणे : प्रतिनिधी 

शौचालये बांधली  नसताना देखील शौचालयाचे बांधली असल्याबाबतचे 9 लाख 40 हजारांचे बिल काढून, ते महापालिकेच्या लेखापालाकडे पाठवून धनादेशाची मागणी केल्याच्या प्रकरणात बुधवारी राज्याचे प्रधान सचिव तसेच महापालिकेचे तत्कालिन आयुक्‍त महेश पाठक यांची साक्ष घेण्यात आली. 

आरोपपत्रानुसार, याप्रकरणी पुणे महानगर पालिकेचे गलिच्छवस्ती निर्मूलन विभागाचे उपायुक्‍त लक्ष्मण रामभाऊ डामसे (50, निगडी प्राधिकरण),  सहायक अभियंता प्रदिप भालचंद्र नाईक (51, प्रेमनगर सोसायटी, बिबवेवाडी), कनिष्ठ अभियंता अजय दत्‍तात्रेय वायसे (37, रा. पीएमसी वसाहत, घोरपडे पेठ) आणि ठेकेदार महंमद सादीक गफुर लुकडे (रा. सॅलसबरी पार्क) यांच्यावर भ्रष्टाचाराच्या विविध कलमानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोषारोपपत्र दाखल केले आहे. 

दि. 7 एप्रिल 2005 ते 2 जुलै 2007 या कालावधीत डामसे, नाईक, वायसे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला. त्यांनी खाजगी ठेकेदार असलेल्या लुकडेशी आर्थिक हितसंबंधासाठी संगनमत केले. प्रभाग क्रमांक 35 येथील मशिदीच्या मागील बाजूस 20 सिटचे शौचालयउभारण्याचे काम मंजूर होते. परंतु, प्रत्यक्षात बांधकाम झाले नसताना खोट्या हिशोबाच्या नोंदी रजिस्टरमध्ये केल्या. तसेच खोटे दस्तऐवज तयार केले व 9 लाख 40 हजार 454 रूपयांचे बिल व कागदपत्रे पाठवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. 

याप्रकरणात तत्कालिन पोलिस निरीक्षक विनोद सातव यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात महापालिकेचे तत्कालिन आयुक्‍त महेश पाठक यांनी प्राथमिकदृष्ट्या तथ्य आढळल्याने कारवाई करण्याची परवानगी दिली होती. याप्रकरणात आज पाठक यांची सर तपासणी अतिरिक्‍त सरकारी वकील मच्छिंद्र गटे यांनी घेतली. त्यात पाठक यांना परवानगी दिल्याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी पाठक यांची उलट तपासणीही घेण्यात आली.