पुणे : अक्षय फाटक/ज्ञानेश्वर भोंडे
सीसीटीव्हीमुळे तपासामध्ये होणारी मदत, राज्यभरातील गुन्हेगारांची एका क्लिकवर मिळणारी माहिती, सायबर क्राईम आणि इतर जवळपास सर्वच विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पोलिस यंत्रणेला तांत्रिक बळ मिळाले असले तरी वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत अपुरी कर्मचारी संख्या, वाढलेले काम आणि गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांच्या नाकीनऊ येत आहे. त्यामुळे पोलिसांवर ताण मात्र वाढत असल्याचे दिसून येत आहे.
शिक्रापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे पोलिस कॉन्स्टेबल प्रल्हाद सातपुते यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यावरून पोलिसांमधील ताण वाढल्याचे दिसून येत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात बदलत्या गुन्ह्यांच्या पद्धतीमुळे प्रशासन पोलिस दलात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट पोलिसिंगवर भर देत आहे. वाढत्या तंत्रज्ञानामुळे पोलिसांचेच काम सोपे झाले आहे. नागरिकांचे काही हरवले असल्यास त्यांना पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी लागत होती. पण, आता नागरिकांना पोलिस दलाच्या संकेतस्थळावरच याची तक्रार करता येत आहे. शहरात वर्षाला हजारो अशा घटनांची माहिती लिहून घेण्याचा ताण वाचला आहे.
अत्याधुनिक यंत्रणांचा वापर
गेल्या तीन वर्षांत स्मार्ट पोलिसिंगसाठी पोलिस दलात मोठे बदल केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्यामध्ये ‘सीसीटीएनएस’ तर नागरिकांसाठी ऑनलाईन तक्रार पोर्टल, त्यासोबतच राज्यातील गुन्हेगारांची एकाच ठिकाणी माहिती यासारखे अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. एकीकडे तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येत असताना पोलिसांवरील कामाचा ताण मात्र काही केल्या कमी झालेला नाही. याचे मुख्य कारण वाढलेली लोकसंख्या, गुन्हेगारी व त्या तुलनेत पोलिस दलातील अपुरे मनुष्यबळ, इतकेच काय गुन्ह्यांच्या तपासासोबतच उत्सवात दिवस रात्र करावी लागणारा बंदोबस्त आणि व्हीआयपींच्या बडदास्तीसाठी कायमच तैनात असणारे पोलिस या व इतर कारणांमुळे पोलिसांचा ताण काही कमी होण्याचे नाव घेत नाही.
अक्षय फाटक/ज्ञानेश्वर भोंडे
पोलिसांना सकाळी कामावर आल्यानंतर घरी परत जाईपर्यंत किती वेळ होईल हे सांगता येत नाही. बारा तासांची ड्यूटी बहुतांश वेळा 18 तासांहूनही अधिक होते. बंदोबस्त, धावपळ, गुन्हेगारांचा माग यासोबतच अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांचा असणारा धाक आदींमुळे या तणावात आणखीनच भर पडत आहे. यामुळे जेवणाच्या, झोपण्याच्या वेळा अनिश्चित असतात. या कारणांमुळे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, व्यायामाचा अभाव यामुळे पोलिसांमध्ये मधुमेह, रक्तदाब या व्याधींचे प्रमाण वाढत आहे.