Fri, Apr 26, 2019 10:00होमपेज › Pune › शिक्षक भरतीचे बिगूल वाजले

शिक्षक भरतीचे बिगूल वाजले

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 1:34AMपुणे : प्रतिनिधी 

राज्य शासनाने पवित्र (Portal For Visible to All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीच्या आधारे शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्याचे काम एनआयसीला देण्यात आले होते. एनआयसीने हे पोर्टल पूर्ण केले असून, बुधवारी या पोर्टलच्या चाचणीस सुरूवात करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. पवित्र पोर्टल सुरू झाल्यामुळे शिक्षक भरतीचे बीगुल वाजले असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सन 2012 मध्ये बंद झालेल्या शिक्षक भरतीनंतरही अनेक शाळांनी वैयक्तीक मान्यतांच्या व ना हरकत प्रमाणपत्रांच्या आधारे शिक्षक भरती केली. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता देखील झाली. त्यामुळेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंशत: अनुदानित व अनुदानास पात्र घोषीत केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड व्हावी यासाठी अभियोग्यता आणि बुध्दीमापन चाचणी घेवून या उमेदवारांची पवित्र या पोर्टलमार्फत पारदर्शीपणे शिक्षकभरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक गंगाधर म्हमाणे म्हणाले, पवित्र पोर्टलच्या चाचणीसंदर्भात बुधवारी एनआयसीमध्ये बैठक घेण्यात आली असून या बैठकीत पोर्टलच्या चाचणीस सुरूवात करण्यात आली.  संस्थाचालक रिक्त जागांची जाहीरात कशी देणार, जागा रिक्त कशा समजणार, शिक्षकांना अर्ज कसे करता येणार यासह अन्य मुद्यांबाबत तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात येणार आहे. चाचणी एकदा पूर्ण झाल्यानंतर हे पोर्टल कायमस्वरूपी कार्यान्वित होणार असल्याचे सांगत लवकरच शिक्षक भरतीस प्रारंभ होणार असल्याचा पुनरोच्चार देखील म्हमाणे यांनी केला आहे.

भरती आणि जागांबाबतीत कमालीची गुप्तता...

राज्यात यंदा शिक्षक भरती होणार हे जरी खरे असले तरी ती नेमकी कशी होणार आणि नेमक्या किती जागा भरण्यात येणार याबाबतीत मात्र अधिकारी तसेच वरिष्ठांकडून कमालीची गुप्‍तता पाळण्यात येत आहे. संबंधित बाबतीत ज्या-ज्या वेळी अधिकार्‍यांना विचारणा करण्यात येते, त्या-त्या वेळी अधिकारी टोलवाटोलवी करताना दिसून येत असून, भरती आणि जागांबाबतीत ब्र सुध्दा काढत नसल्याचे दिसून येत आहे.