Wed, Jul 17, 2019 10:39होमपेज › Pune › निगडीत उभा राहिला सर्वांत उंच ध्वजस्तंभ

निगडीत उभा राहिला सर्वांत उंच ध्वजस्तंभ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकातील उद्यानात 107 मीटर उंचीचा सर्वांत उंच ध्वजस्तंभ रविवारी (दि.26) उभा करण्यात आला. ध्वजस्तंभाचा लोखंडी खांब बसविण्यासाठी कामगारांना मोठी कसरत करावी लागली. या कामामुळे बघ्यांची गर्दी होऊन वाहतूककोंडीत भर पडली. 

पालिकेच्या वतीने निगडी चौकातील उद्यानात सर्वांत उंच ध्वजस्तंभ उभारण्याचा निर्णय मागील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला होता. या कामाचे भूमिपूजन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पालिका निवडणुकीपूर्वी झाले होते. सदर ध्वजस्तंभ उभारण्याच्या प्रत्यक्ष कामास शनिवारी (दि.25) सुरुवात झाली. ध्वजस्तंभाचे लोखंडी खांब चौकात आणण्यात आले. वेगवेगळे असलेल्या या खांबांची जोडणी केली केली. सदर खांब बसविण्याचे काम एस. एस. साठे कंपनीच्या वतीने रविवारी सकाळी सहाला सुरू झाले. 80 मीटर उंचीच्या क्रेनद्वारे हे काम केले जात आहे. 

सदर सायंकाळी सहापर्यंत सुरू होते. त्यामुळे बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.  तसेच, कामामुळे वाहतुकीचा एक मार्ग बंद केला होता. परिणामी, वाहतूककोंडी होऊन ती संथ झाली होती15 ऑगस्ट 2017ला ध्वजस्तंभाचे काम पूर्ण करून तिरंगा फडकाविण्याचे नियोजन होते. मात्र, नियोजन फसले आहे. त्यासाठी 3 कोटी 63 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. उद्यानातील 10 गुंठे जागेत ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. त्या ठिकाणी लँडस्केप केले जाणार आहे. केंद्रीय गृह विभागाने या प्रकल्पास मंजुरी दिली आहे. बजाज इलेक्ट्रिकल कंपनीने 120 बाय 90 फूट आकाराचा तिरंगा ध्वज तयार केला आहे. 

येथील विद्युतकाम, लँडस्केप आणि इतर कामे अद्याप शिल्लक आहेत. त्यास महिना ते दीड महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. काम पूर्ण झाल्यानंतर महापालिका आयुक्तांची परवानगी घेऊन येत्या  26 जानेवारी 2018 हा तिरंगा ध्वज फडकाविण्याचे नियोजन आहे, असे नगरसेवक राजू मिसाळ यांनी सांगितले.  

सर्वांत उंच तिरंगा वाघा बॉर्डरवर

देशात 105 मीटर उंचीचा तिरंगा ध्वज वाघा बॉर्डर येथे आहे. कोल्हापूरमध्ये 82 मीटर उंचीचा स्तंभ आहे, तर पुणे महापालिकेच्या वतीने कात्रज तलाव येथे उभारलेला ध्वजस्तंभ 72 मीटर आहे; तसेच दापोडी येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (सीएमई) येथे उंच ध्वजस्तंभ आहे. त्याचबरोबर शनिवार वाड्यासमोरही असा स्तंभ लावलेला आहे.