होमपेज › Pune › राज्यातील बोली भाषांचे होणार सर्वेक्षण

राज्यातील बोली भाषांचे होणार सर्वेक्षण

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 22 2018 1:10AMपुणे : प्रतिनिधी 

राज्य मराठी विकास संस्था आणि डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था, यांच्याद्वारे अभ्यासासाठी ‘मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण : प्रतिमांकन आणि आलेखन’ (2017-2020) हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. राज्यातील बोली भाषांचा अभ्यास, भाषावैज्ञानिक दृष्टिकोनातून करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला असल्याची माहिती डेक्कन कॉलेजच्या भाषाशास्त्र विभागाच्या प्राध्यापक आणि प्रकल्पप्रमुख डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. आनंद काटीकर, डेक्कन विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. प्रसाद जोशी  उपस्थित होते. 

या वेळी सोनल जोशी म्हणाल्या, बोली भाषांचा अभ्यास करताना त्या भाषेतील शब्दांचे, म्हणींचे, वाक्प्रचारांचे, लोकगीतांचे संकलन म्हणजेच बोली भाषेचा अभ्यास असे सर्वसाधारणपणे समजले जाते. अशा प्रकारे भाषांचा अभ्यास विद्यापीठीय स्तरावर यापूर्वी झाला असून, आताही होत आहे. दरम्यान, बोली भाषांचा अभ्यास भाषावैज्ञानिक दृष्टिकोनातून क्वचितच होताना दिसत आहे. भारतीय बोली भाषांचे भाषावैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यासाचे उत्तम उदाहरण म्हणून आजही 1905-26 च्या दरम्यान ग्रीयर्सनने केलेल्या सर्वेक्षणाचाच उल्लेख केला जातो. ग्रीयर्सन नंतरही मराठीची काही सर्वेक्षणे झाली. दरम्यान, ही सर्वेक्षणे ‘कोकणी’ हीच मराठीची मुख्य बोली असे समजून किंवा शब्दस्तर हाच महत्त्वाचा असे गृहीत धरून करण्यात आली. त्यामुळे बोलींचेही व्याकरण असते, हा भाषावैज्ञानिक दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवून आत्ताच्या ह्या प्रकल्पाची आखणी करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील बोली भाषांचा अभ्यास करण्यात येणार आहे. मराठी भाषेतील भौगोलिक आणि सामाजिक स्तरांवर आढळणार्‍या काही निवडक व्याकरणिक विशेषांचे भाषावैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण करण्यात येणार आहे. तसेच नकाशाच्या स्वरूपात त्यांचे प्रस्तुतीकरण केले जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत  जिल्ह्यातील, तालुक्यातील गावांमध्ये त्या त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष क्षेत्र पहाणी करणे, मुलाखती घेऊन भाषिक नमुने मिळविणे, त्यांचे प्रतिमांकन आणि भाषावैज्ञानिक विश्लेषण करणे ह्या टप्प्यांतून हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पात तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार असून ईलॅन आणि एफएलईएक्स सारख्या सॉप्टवेअरचा वापर करून, माहितीचे व्याकरणिक प्रतिमांकन करण्यात येणार असल्याचे डॉ. सोनल कुलकर्णी- जोशी यांनी सांगितले. 

डेक्कन कॉलेजची भाषाभ्यासाची दीर्घ परंपरा लक्षात घेऊन, राज्य मराठी विकास संस्थेद्वारे हा महत्त्वाचा प्रकल्प कॉलेजकडे सोपविण्यात आला आहे. प्रकल्पांतर्गत घेतलेल्या प्रशिक्षणाच्या समारोपाचा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 20) रोजी डेक्कन कॉलेज येथे पार पडला. यावेळी  कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अ‍ॅड. बेंद्रे आणि मराठी अभ्यास परिषदेचे अध्यक्ष प्र. ना. परांजपे आदी उपस्थित होते. 

सर्वेक्षणासाठी प्रशिक्षित उमेदवारांची निवड  

बोली भाषांचा भाषावैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी प्रशिक्षित विद्यार्थ्यांची आवश्यकता होती. त्यानुसार राज्यातील विद्यापीठांना आवाहन करून प्रशिक्षणार्थी मिळवले. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत त्यातून 14 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. डेक्कन कॉलेजमध्ये झालेल्या प्रशिक्षणात काही मूलभूत भाषावैज्ञानिक संकल्पनांची ओळख करून देणे, भाषिक नमुने कसे गोळा करायचे, फोनेटिक स्क्रिप्ट वापरून या नमुन्यांचे प्रतिलेखन कसे करायचे, भाषावैज्ञानिक पद्धती वापरून व्याकरणिक विश्लेषण कसे करायचे, आदी कौशल्य प्रशिक्षणार्थींनी तीन महिन्यात देण्यात आली. राज्यातील वर्धा, जळगाव, धुळे, अमरावती, नगर, सोलापूर, कोल्हापूर, चंदगड आणि पुणे आदी ठिकाणांहून बारा प्रशिक्षणार्थिंनी प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यांच्यामधून आठ जणांची प्रकल्प सहाय्यक म्हणून नेमणूक केली जाणार आहे.