Thu, Jun 27, 2019 01:56होमपेज › Pune › भुयारी मार्ग ‘मेट्रो’वर अवलंबून!

भुयारी मार्ग ‘मेट्रो’वर अवलंबून!

Published On: Sep 04 2018 1:18AM | Last Updated: Sep 04 2018 12:17AMपिंपरी ः मिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील दापोडी येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या (सीएमई) प्रवेशद्वारासमोर भुयारी मार्गाचे (सबवे) काम सुरू आहे. हा मार्ग डिसेंबर महिन्यात वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन आहे; मात्र पुणे मेट्रोने सेगमेंटचे काम पूर्ण झाल्यानंतर, सुरक्षा लक्षात घेऊन येथून वाहतूक सुरू केली जाऊ शकते. त्यामुळे या मार्गाचे भवितव्य आता मेट्रोवरच अंवलबून आहे.

2006 मध्ये विकसित केलेल्या या ग्रेडसेपरेटर मार्गावरून दापोडीस ये-जा करण्यासाठी जोडरस्ता किंवा भुयारी मार्ग निर्माण केलेला नव्हता. त्यामुळे या कामास सीएमईसमोर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरुवात झाली. पुणे मेट्रो व भुयारी मार्गाचे एकत्रित मात्र स्वतंत्रपणे काम सुरू आहे. भुयारी मार्गाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सध्या फुगेवाडीच्या बाजूचा रॅम्प बांधण्याचे काम सुरू आहे. त्याची लांबी 233.70 मीटर आहे. तर, हॅरिस पुलाच्या बाजूचा रॅम्पची लांबी 123.70 मीटर आहे. या कामास 10 महिन्यांची मुदत आहे. मात्र, मेट्रोच्या कामामुळे काम करता न आल्याने पालिकेने ठेकेदाराला मुदतवाढ दिली आहे. 

या भुयारी मार्गावरून मेट्रोची मार्गिका आहे. मात्र, अद्याप पिलर उभारणीचेच काम सुरू आहे. येथील सुमारे 10 पिलरचे काम अपूर्ण स्थितीत आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर सेगमेंट बसविले जातील. त्यानंतरच पालिकेस हा मार्ग वाहतुकीस खुला करता येणार आहे.पुणे मेट्रोच्या या ठिकाणच्या कामाचा वेग पाहता हे काम डिसेंबरमध्ये पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी आहे. मेट्रोच्या वतीने खराळवाडी येथे गर्डर लॉर्न्चर मशिन बसविले आहे. दोन मशिन दापोडी आणि कुंदननगर, कासारवाडी येथे बसविले जात आहेत. दापोडीतील सेगमेंटची जुळवणी फुगेवाडी-कासारवाडीच्या दिशेने केली जाणार आहे. त्यामुळे हॅरिस पुलाच्या बाजूने पिलरसाठी चौथे गर्डर लॉर्न्चर मशिन बसवावे लागणार आहे. मात्र, त्या संदर्भात अद्याप नियोजन नसल्याचे मेट्रोच्या अधिकार्‍यांनी सांगितले. 

भुयारी मार्गाचे 55 टक्के काम पूर्ण

मेट्रोच्या कामामुळे या भुयारी मार्गाच्या कामास उशीर झाला आहे. आतापर्यंत 55 टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ दोन्ही बाजूने रॅम्पची निर्मिती आणि त्यावर कठडे बांधण्याचे काम शिल्लक आहे. हा मार्ग डिसेंबर महिन्यात वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन आहे. मात्र, पुणे मेट्रोचे येथील सेगमेंटचे काम पूर्ण झाल्यानंतरच हा मार्ग वाहतुकीस खुला होऊ शकतो, असे प्रवक्ते विजय भोजने यांनी सांगितले.