Tue, Apr 23, 2019 14:10होमपेज › Pune › शहाळे विक्रेत्याने शोधला प्‍लास्टिकला पर्याय

शहाळे विक्रेत्याने शोधला प्‍लास्टिकला पर्याय

Published On: Mar 21 2018 2:10AM | Last Updated: Mar 21 2018 1:18AMपिंपरी : वर्षा कांबळे 

राज्य शासनाने नुकतीच प्‍लास्टिक बंदी केली आहे. यामुळे प्‍लास्टिकला नवीन पर्याय समोर येत आहेत. मात्र, प्‍लास्टिकचे गांभीर्य यापूर्वीच ओळखून निगडी येथील नारळपाणी विक्रेते नितीन बर्‍हाटे हे गेल्या पाच वर्षांपासून नारळपाणी पार्सलसाठी प्‍लास्टिक पिशवी वापरत नाहीत. त्यांना निसर्गसंवर्धक उमेश वाघेला यांनी सुचवलेल्या दाभणाच्या साह्याने नारळामध्ये सुतळी ओवण्याच्या क्लृप्तीमुळे ग्राहकांना पार्सल नेणे सोयीचे झाले आहे. यामुळे पैशांच्या बचतीबरोबर पर्यावरणाचे  संवर्धनही होत आहे.

उमेश वाघेला यांनी एकूण सहा नारळ पाणी विक्रेत्यांचे प्रबोधन केले. प्रथम निगडी येथील नारळपाणी विक्रेते नितीन बर्‍हाटे यांना नारळाला सुतळी ओवून प्लास्टिक पिशवी न वापरण्यास सुचवले. त्यांनी ते त्वरित अमलातही आणले. गेली पाच वर्षे बर्‍हाटे यांनी प्लास्टिक पिशवीमध्ये एकाही नारळाची विक्री केली नाही. याविषयी ते सांगतात,  अनेक ग्राहक घरी पार्सल घेऊन जातात. पार्सल न्यायला त्यांच्याकडे पिशव्या नसतात. प्लास्टिक पिशवी फार मजबूत नसल्याने दुचाकीवाल्यांना दोन पिशव्यांत एक नारळ द्यावा लागत होता. त्यामुळे आम्हाला खर्चही फार येत होता;  जेव्हा वाघेला यांनी आम्हाला सुतळीची कल्पना सुचवली तेव्हापासून आम्ही नारळाबरोबर एकही प्लास्टिक पिशवी दिली नाही.  

दर महिनाअखेर हिशेब केल्यावर सुमारे पाच हजार नारळ विकल्यावर एक हजार रुपयांचा फायदा होत आहे. या आधी प्लास्टिक पिशव्या वापरताना दर 30 पिशव्यांच्या एका पाकिटाकरिता 8 रुपये मोजावे लागत होते. आत सरासरी महिन्याला एक हजार रुपयांची बचत होऊ लागली. पाच वर्षांत एकही प्लास्टिक पिशवी न वापरल्याने एकूण 60 हजार रुपयांची बचत झाली आहे.नितीन बर्‍हाटे यांच्यासह आसपासच्या अन्य तीन नारळ विक्रेत्यांनी अशाच प्रकारे पिशव्या टाळून नारळ विक्री करण्यास सुरुवात केली आहे. त्यांचीही मोठी बचत होत आहे. 

Tags : pune, pune news, The substitute, plastic discovered,  shahale seller