Wed, May 27, 2020 00:08होमपेज › Pune › विद्यार्थ्यांना बदलता येणार बारावीसाठी महाविद्यालय

विद्यार्थ्यांना बदलता येणार बारावीसाठी महाविद्यालय

Published On: May 16 2019 2:10AM | Last Updated: May 16 2019 1:37AM
पुणे : प्रतिनिधी 

सध्या इयत्ता अकरावीत शिकत असलेल्या आणि 2019-20 या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावी इयत्तेत जाणार्‍या विद्यार्थ्यांना मनासारखे महाविद्यालय आणि मनासारखी शाखा निवडण्याची संधी मिळणार आहे. 

इयत्ता अकरावीतून बारावीत प्रवेश करीत असताना विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालय किंवा शाखा बदलायची असते. परंतु, शहरातील अनेक नामांकित महाविद्यालये विद्यार्थ्यांना महाविद्यालय तसेच शाखा बदलण्यास नकार देतात व आपल्याच महाविद्यालयात किंवा आहे त्याच शाखेत राहण्यास त्यांच्यावर दबाव आणतात. त्यामुळे महाविद्यालय आणि शाखा बदलासाठी काही विद्यार्थ्यांनी उपसंचालक कार्यालयाकडे दाद मागितली होती. त्यानुसार, प्रभारी उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि शाखा बदलण्यास मान्यता दिली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना राऊत यांनी पत्राद्वारे दिलेल्या आदेशानुसार, सध्या विद्यार्थी शिक्षण घेत असलेले महाविद्यालय घरापासून लांब असणे, पालकांची बदली होणे, वैद्यकीय कारणास्तव राहत असलेल्या परिसरात कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळणे, शाखा बदलून मिळणे,

विद्यार्थ्यांच्या राहण्याचा पत्ता बदलणे, इयत्ता बारावीमध्ये बोर्ड बदलणे अशा कारणांसाठी महाविद्यालय बदलता येणार आहे. त्यास महाविद्यालयांनीही परवानगी देणे गरजेचे आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाखा किंवा महाविद्यालय बदलल्यानंतर ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या माहितीमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून घेण्याची कार्यवाही संबंधित महाविद्यालयांनी करणे आवश्यक राहील, असे आदेशात स्पष्ट म्हटले आहे.