Sun, Jun 16, 2019 12:11
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › शासनाच्या धोरणाचे विद्यार्थी ठरताहेत बळी

शासनाच्या धोरणाचे विद्यार्थी ठरताहेत बळी

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 04 2018 12:30AMपुणे : नरेंद्र साठे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सुटणार्‍या कमी जागा, अभ्यासाचा असणारा ताण, यामुळे पुण्यासह राज्यभरात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना नैराश्याने ग्रासले आहे. पुण्यातील प्रीती जाधव या तरुणीने याच नैराश्यातून स्वतःचं आयुष्य संपवलं. यास राज्य शासनाचे नोकरकपातीचे धोरण जबाबदार असल्याचा सूर पुण्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांमधून उमटत आहे.

पुण्यामध्ये 8 फेब्रुवारीला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. या दरम्यान काही विद्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्याप्रमाणे एमपीएससीचे विद्यार्थी आत्महत्या करतील अशी भिती व्यक्त केली होती. महिनाभराचा कालावधी लोटत नाही तोच पुण्यातच एका मुलीने स्पर्धा परीक्षेत आलेल्या नैराश्यातून  आत्महत्या केली. शासकीय नोकरी मिळावी या आशेने राज्यभरातील लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. खासगी क्‍लासेसमुळे स्पर्धा परीक्षा कशी सोपी आहे हे ग्रामीण भागापर्यंत पोचले. जिल्ह्याच्या ठिकाणाबरोबरच पुण्यात लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात; परंतु त्यांच्या इच्छाशक्तीला शासनच आडवे येत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पद्धतीमध्येदेखील मोठे बदल केले आहेत. यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा हीदेखील विद्यार्थ्यांच्या नैराश्याचे कारण ठरत आहे. राजू पवार हा विद्यार्थी सांगतो की, माझी उंची पोलिस उपनिरीक्षकपदासाठी पुरेशी नाही; मात्र, संयुक्त परीक्षेमध्ये मी पोलिस उपनिरीक्षकपदाची पूर्वपरीक्षा पास झालो; परंतु मला पोलिस उपनिरीक्षक व्हायचेच नाही तर मी परीक्षा का देऊ? पण यामुळे इतर मुलांच्या जागेची अडवणूक होत आहे.

एमपीएससीद्वारे राज्य सेवा पूर्वपरीक्षेसाठी केवळ 69 जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली; तर  28 फेब्रुवारीला प्रसिद्ध केलेल्या संयुक्त पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीमध्ये विक्रीकर निरीक्षकपदासाठी फक्त 34, मंत्रालय सहायकपदासाठी 28 आणि पोलिस निरीक्षकपदासाठी 387 जागा प्रसिद्ध केल्या आहेत. दोन वर्षांपासून कमी होत चाललेल्या जागांचा तणाव विद्यार्थ्यांवर पडत आहे. अभ्यासाच्या तणावाबरोबरच उपलब्ध जागेत आपण बसणार का याचा ताण विद्यार्थी घेत आहेत. दिवसेंदिवस स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये होणारी वाढ आणि परिणामी वाढणारी स्पर्धा. यामध्ये टिकून स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करतात; परंतु शासनाच्या नाकर्त्या धोरणाचा जर हे बळी ठरणार असतील तर शासनाने नोकरभरतीच्या धोरणात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

शासनाने नोकरभरती कपातीचा निर्णय घेतल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये सध्या प्रचंड तणाव आहे. त्याचाच परिणाम म्हणून चिंचवडमध्ये एका विद्यार्थिनीने आत्महत्येचा पर्याय निवडला. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मोर्चे काढले; परंतु शासनाने याची दखल घेतली नाही. आता आत्महत्येतून शासनाला त्यांचे उत्तर मिळत आहे. शासनाचे नोकर भरतीचे धोरण असेच राहिले तर आणखी आत्महत्या होऊ शकतात आणि याची सर्वस्व जबाबदारी ही शासनाची असेल.  -अमोल पालकर, विद्यार्थी

रिक्त जागा 1 लाख 78 हजार असतानादेखील स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय कमी जागांसाठी जाहिराती येतात. विद्यार्थी अभ्यासाचा ताण घेतात; परंतु आता जागाच येत नसतील तर जास्तच तणाव येणार. एवढ्या कमी जागेमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी विद्यार्थी झगडत आहेत; परंतु शासन लाखो विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत नाही. -महेश बडे, विद्यार्थी