Wed, Aug 21, 2019 02:33होमपेज › Pune › #Women’sDayकष्टकरी महिलांच्या पाठिराख्या आजी

#Women’sDayकष्टकरी महिलांच्या पाठिराख्या आजी

Published On: Mar 08 2018 1:20AM | Last Updated: Mar 08 2018 1:20AMयोग्य वेळी आणि योग्य वयात आपल्यासह इतरांच्या हक्कांची जाणीव होऊन, त्यासाठी लढण्याची तयारी दर्शवणार्‍यांची संख्या तशी कमीच असते. पुण्यात मात्र अशा एक आजीबाई आहेत. वयाच्या पासष्ठीतही अनेक ठिकाणी प्रवास करून, कष्टकरी, कामगार महिलांसाठीचा त्यांचा लढा सुरू आहे. सरस्वती  भांडिर्गे या 65 वर्षांच्या आजीबाई गेली 30 वर्षे हे काम अहोरात्र करत आहेत.

महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचा हा जीवनप्रवास अनेकांना प्रेरणा देऊन जातो. गेली तीस वर्षे आजी ‘स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समितीच्या’ माध्यमातून महिलांसाठी काम करत आहेत. पुणे जिल्ह्याच्या त्या अध्यक्ष असून, महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष आहेत. कष्टकरी घरकाम करणार्‍या महिलांना त्यांचे पायाभूत हक्क मिळवून देण्यासाठी; त्यांची कामगार म्हणून नोंदणी व्हावी यासाठी 2008 मध्ये त्यांनी आंदोलन केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन 2011 मध्ये घरकामगार महिलांना कामगार असा दर्जा मिळाला आणि तसा सामाजिक सुरक्षा कायदाही अंमलात आणला गेला. 

ज्या भागात महिलांना छेडछाडीसारख्या प्रश्‍नांना सामोरे जावे लागत होते, अशा भागात पोलिस चौकीची मागणी करणे, महिलांचे पाणी प्रश्‍न, आरोग्याचे प्रश्‍न सोडवणे अशी कामे त्या करत असत. कालांतराने काही घरकाम करणार्‍या महिलांनी त्यांचे प्रश्‍न सोडवण्याची गळ आजींना घातली आणि त्या महिलांसाठी च्या लढ्यात उतरल्या. त्यातूनच सामाजिक सुरक्षा कायद्याचे फलित मिळाले आहे. याशिवाय या महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्कॅालरशिप मिळवून देणे अशी अनेक कामे स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समितीद्वारे सुरू असतात.

महिला दिनाच्या निमित्ताने त्या मुलींना सांगतात की, मुलींनी घरात बसून न राहता आपल्या हक्कांसाठी संघर्ष केला पाहिजे. शिक्षण, राजकारण, समाजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी सहभाग घेऊन आपले अस्तित्व टिकवले पाहिजे. सरस्वती आजींसारख्या महिला हिरिरिने महिलांसाठी काम करत आहेत. त्यामुळेच आज महिलांसाठीच्या संघटनांना बळकटी आलेली आहे.

-ज्योती बनकर