Wed, Jun 26, 2019 17:26होमपेज › Pune › राज्यावर  पुढील सहा दिवस पावसाचे सावट  

राज्यावर  पुढील सहा दिवस पावसाचे सावट  

Published On: Feb 06 2018 4:20PM | Last Updated: Feb 06 2018 4:20PMपुणे: प्रतिनिधी 

राज्यात आज पासून पुढील सहा दिवस पावसाचे सावट असणार आहे, असा अंदाज ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दै. पुढारीशी बोलताना वर्तविला आहे. अरबी समुद्राच्या दक्षिण भागांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, जमा झालेले ढग कर्नाटकपर्यंत पोहोचले आहेत. या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरीदेखील दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल, असे साबळे यांनी नमूद केले आहे. गारपिटीचा कोणताही अंदाज तूर्तास तरी नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. 

 थंडीचा औपचारिक हंगाम जानेवारीमध्येच संपला असला तरी देखील राज्यातून थंडीने अद्यापही एक्झिट घेतलेली नाही. पुढील सहा दिवस असणार्‍या ढगाळ वातावरणामुळे कमाल व किमान तापमानात वाढ होत थंडी गायब होणार आहे. मात्र, मंगळवारपासून (दि. 13) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढेल व बोचरी थंडी फेब्रुवारी अखेरपर्यंत कायम राहील. मार्चच्या पहिल्या आठवड्यात उन्हाळ्याची चाहूल लागणार असून, सर्व भागातील कमाल व किमान तापमानात लक्षणीय वाढ होईल, असेही साबळे यांनी सांगितले. 

राज्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी पळाली 

राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मंगळवारच्या ढगाळ वातावरणामुळे थंडी पळाल्याचे चित्र दिसले. दक्षिण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या दिशेने येणारे ढग बाष्प घेऊन येत आहेत. बाष्पाचे प्रमाण कमी असले तरीदेखील पावसासाठी वातावरण पोषक असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. आज (बुधवारी) दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

राज्यात थंडीचा कडाका मंगळवारी पूर्णपणे कमी झाला. मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाल्याचे सांगण्यात आले. राज्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद उस्मानाबाद येथे 10.7 अंश सेल्सिअस एवढी करण्यात आली. तर महत्त्वाच्या शहरांमध्ये मुंबई 19, पुणे 13.5, कोल्हापूर 16.3, नगर 13.7, रत्नागिरी 18.4, नाशिक 13.8, सांगली 14.6, सातारा 12.4, सोलापूर 15.6, औरंगाबाद 15, नागपूर 16 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.