Sun, Mar 24, 2019 06:51होमपेज › Pune › साखर निर्यातीसाठी राज्याने पाचशे रुपये अनुदान द्यावे : हर्षवर्धन पाटील

साखर निर्यातीसाठी राज्याने पाचशे रुपये अनुदान द्यावे : हर्षवर्धन पाटील

Published On: Dec 30 2017 1:30AM | Last Updated: Dec 30 2017 1:14AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

राज्यात मागील 21 दिवसात साखरेचे भाव क्विंटलला सहाशे रुपयांनी घसरुन 3 हजार रुपयांवर खाली आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारनेच क्विंटलला पाचशे रुपये अनुदान देऊन 25 लाख टन साखर तातडीने निर्यात करावी आणि तीस लाख टनांचा राखीव साठा (बफर स्टॉक) करुन राज्य बँकेंचे साखर मुल्यांकन 85 वरुन 90 टक्के करणे गरजेचे असल्याची माहिती राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

साखर संकुल येथे शुक्रवारी राज्य साखर संघांच्या पुढाकाराने आयोजित कारखान्यांच्या बैठकीनंतर ते ‘पुढारी’शी बोलत होते. साखरेच्या घसरत्या बाजारभावावर बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली असून केंद्राकडून साखर निर्यातीच्या निर्णय घेण्यास अवधी लागू शकतो. त्यामुळे निर्यातीचा निर्णय राज्य सरकारनेच घ्यावा अशी मागणी बैठकीत करण्यात आल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारनेच राखीव साठ्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

कारखाना गोदामात साखर राहील आणि व्याज व विम्याचा हप्ता राज्य सरकारने द्यावा. अशा उपाययोजना तत्काळ केल्यास सध्याच्या साखरेच्या भावातील घसरणीस आळा बसण्यास मदत होईल. साखर विक्रीसाठी मार्केटिंगही महत्त्वाचे झालेले आहे. त्यामुळे प्रत्येक कारखान्याने मार्केटिंग अधिकारी नेमण्यावरही सहमती झालेली आहे.

सद्य:स्थितीत साखर विक्रीमध्ये होत असलेल्या अनावश्यक स्पर्धेत एखाद्या कारखान्याने कमी भावात माल विक्री केल्याचा फटका सर्व कारखान्यांना बसत आहे. कारण संबंधित कारखान्याचे नावे घेऊन व्यापार्‍यांकडून कमी भावात साखरेची मागणी केली जात आहे.