Mon, Jan 21, 2019 21:57होमपेज › Pune › संगमवाडीत नक्की दडलंय काय !

संगमवाडीत नक्की दडलंय काय !

Published On: Feb 19 2018 1:37AM | Last Updated: Feb 19 2018 12:50AMपुणे : पांडुरंग सांडभोर  

शहराच्या जुन्या हद्दीच्या उर्वरीत विकास आराखड्यास (डीपी) राज्य शासनाने शनिवारी मंजुरी दिली, मात्र, संगमवाडीतील आरक्षणाचा तिढा कायम ठेवला आहे. याठिकाणी काही बड्या बांधकाम व्यावसायिकांनी जागा घेतल्या आहेत. त्यामुळे संगमवाडीतील आरक्षणाचा निर्णय प्रलंबित ठेवण्यामागे काय गणित दडलय, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा तब्बल दहा वर्ष रेंगाळला. गतवर्षी पालिका निवडणूकीच्या तोंड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आराखड्यास मंजुरी दिली. मात्र, त्यामधील अनेक निर्णय प्रलंबित होते, अखेर राज्य शासनाने त्यावर वर्षभरानंतर मंजुरी दिली, मात्र हा उर्वरीत आराखडा मंजुर करताताना शासनाने पुन्हा एकदा काही निर्णय प्रलंबितच ठेवले आहेत. त्यात प्रामुख्याने संगमवाडी बिजनेस झोन आणि शहराच्या डोंगरमाथा आणि डोंगर उतारावरील बांधकामे यावर निर्णय घेण्याचे टाळले आहे.

विकास आराखडा तयार करताना संगमवाडीच्या 100 पेक्षा अधिक एकरावर सेंट्रल बिजनेस डिस्ट्रीकचे (सीबीझेड) आरक्षण पालिका प्रशासनाने टाकले आहे. त्यापुर्वी हा भाग शेती क्षेत्र होता. मात्र आता सीबीझेड आरक्षणामुळे  हा भाग भविष्यात व्यापारी क्षेत्र म्हणून विकसीत होऊ शकणार आहे; मात्र, तब्बल दोनवेळा आराखड्याला मंजुरी देताना शासनाकडून संगमवाडीतील नागरी विकासाची आरक्षणे तसेच, सीबीझेड आरक्षणाचा तिढा कायम ठेवला आहे. त्यामुळे या भागात रस्ते, क्रिडांगणे अशा सुविधा निर्माण करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे संगमवाडीतल नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. 

दरम्यान, या भागात शेती झोन असताना काही बड्या व्यावसायिकांनी जमिनी विकत घेतल्या आहेत. त्यामुळे आता नक्की कोणाच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्याचे टाळले जात आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जाऊ लागला आहे.