होमपेज › Pune › ‘स्थायी’चा ठराव माझ्यापर्यंत आला नाही : पिंपरी आयुक्त

‘स्थायी’चा ठराव माझ्यापर्यंत आला नाही : पिंपरी आयुक्त

Published On: Apr 29 2018 2:41AM | Last Updated: Apr 29 2018 2:14AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील घरोघरचा कचरा संकलित करून तो कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याच्या कामाची निविदा रद्द केली आहे. तो ठराव अद्याप माझ्यापर्यंत आलेला नाही. ठराव आल्यावर त्यावर उचित निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी (दि.27) दिली. 

शहराचे दोन भाग करून शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो वाहतूक करून मोशी कचरा डेपोपर्यंत नेऊन टाकण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. हे काम ए. जी. इनव्हायरो इन्फा प्रोजेक्टस आणि बीव्हीजी इंडिया या दोन कंपनीस देण्यास  स्थायी समितीने 21 फेबु्रवारीला मंजुरी दिली. त्यासाठी वार्षिक 56 कोटींचा खर्च होता. हे काम 8 वर्षे कालावधीसाठी होते. ठेकेदाराला दरवर्षी 5 टक्के दरवाढ देण्यात येणार होती. 

या निविदा प्रक्रियेत भाजपचे पदाधिकारी, अधिकारी व ठेकेदारांनी संगनमत करून ‘रिंग’ केल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेने केली होती. त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडेही तक्रारी करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने उच्च न्यायालयात दावाही दाखल केला आहे. आयुक्तांनी घेतलेल्या गटनेत्यांच्या बैठकीतही शिवसेना व राष्ट्रवादीने त्या निविदेवर शंका उपस्थित करीत फेरनिविदा काढण्याची आग्रही मागणी केली होती. 

वाढता विरोध लक्षात घेऊन अखेर स्थायी समितीने सदर कामास दिलेली मंजुरीच रद्द करून सर्व 8 क्षेत्रीय कार्यालय हद्दीनुसार फेरनिविदा काढण्याचा सूचना पालिका प्रशासनाला दिल्या. त्यासंदर्भात भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी पालिकेत पत्रकार परिषद घेऊन त्या निविदा प्रक्रियेत एक रूपयाही खाल्ला नसल्याचे सांगितले. तसेच, कमी दर प्राप्त होणार असल्याने मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून फेरनिविदा काढत असल्याचा दावा केला. 

दरम्यान, या संदर्भात राज्य शासनाकडून पर्यावरण तज्ज्ञांचा अहवाल मागविण्यात येणार होता. तो पालिकेस प्राप्त झाला असून, पालिकेने राबविलेली निविदा प्रक्रिया योग्य असल्याचे त्या अहवालात म्हटले आहे. 

या संपूर्ण प्रकरणावर आयुक्त पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, शहरातील घरोघराचा कचरा संकलन व कचरा वाहतूक कामासाठी काढलेली निविदा स्थायी समितीने रद्द केली आहे. स्थायी समितीच्या सूचनेवरून नव्याने फेरनिविदा काढण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. तोपर्यंत आहे त्या संस्था ठेकेदारांना मुदतवाढ देण्यात येईल अथवा तात्पुरत्या कालावधीसाठी निविदा काढली जाईल. शहरात पुन्हा अस्वच्छतेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी पालिका प्रशासन घेत आहे. तसेच रद्द केलेल्या निविदासंदर्भात राज्य शासनाने दिलेला अहवाल स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे.