होमपेज › Pune › देशातील परिस्थिती भयभीत स्वरूपाची : शरद पवार 

देशातील परिस्थिती भयभीत स्वरूपाची : शरद पवार 

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 08 2018 1:32AMपुणे : प्रतिनिधी 

देशाची सत्ता ज्यांच्या हाती असते, त्यांनी देशातील सर्व जातीधर्मांतील नागरिकांमध्ये कसा जिव्हाळा निर्माण होईल, हे पाहणे आवश्यक आहे. मात्र, सध्या सरकार आणि त्यांचे नेते समाजा-समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचे काम करत आहेत, जिकडे तिकडे दलित, अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत. यामुळे देशातील परिस्थिती आज भयभीत स्वरूपाची बनलेली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी पवार बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर आमदार दिलीप वळसे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, माजी महापौर अंकुश काकडे, अ‍ॅड. हाजी गफूर पठाण, पी. ए. इनामदार, अनिस सुंडके, जावेद शेख, धीरज शर्मा आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, हल्ले करण्याचा अधिकार आम्हाला आहे, असे काही लोक सांगत आहेत. या देशातील लोकांनी काय खावे, कसे खावे हे सांगितले जात आहे. मौलाना आझाद यांनी देशासाठी काय केले? असा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र, त्यांना मौलाना आझाद यांनी देशाला दिशा देण्याचे काम केल्याचा  विसर पडला आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांना मुस्लीम धर्मीयांची टोपी घालायलाही लाज वाटते, अशा शब्दांत पवार यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली.

ते पुढे म्हणाले,  भाजपच्या एका खासदाराने इसाई धर्मीयांचे या देशासाठी काही योगदान नसल्याचे वक्तव्य केले. देशाची एकात्मता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी जी किंमत द्यावी लागेल ती देण्याची तयारी ठेवा, समाजात दुही माजवणार्‍यांना दूर करा, त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

शीख, मुस्लिम, इसाई यांच्याविरोधात बोलणार्‍यांच्या हातात देशाची सत्ता आहे. शीख समाज हा या देशाचा हिस्सा आहे. देशाला पुढे न्यायचे असेल तर सर्वांनी एकत्र आले पाहिजे. पाकिस्तानच्या नवाज शरीफला जेलमध्ये जावे लागले. तशीच स्थिती भारतात होताना दिसत आहे. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस