Fri, Apr 26, 2019 16:17होमपेज › Pune › भामट्यांचा सात लाखाला गंडा 

भामट्यांचा सात लाखाला गंडा 

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 1:40AMपुणे : प्रतिनिधी

डेबिट आणि क्रेडिट कार्ड धारकांना फोन करून सायबर भामटे गोपनीय माहिती विचारून अलगद खात्यामधील पैसे काढून घेत बँक खातेदारांना लाखोंचा गंडा घालत आहेत. गेल्या आठवड्यात शहरातील ज्येष्ठ महिलेला बँकेतील के्रडिट विभागाचा अधिकारी बोलत असल्याचे सांगत कार्डची गोपनीय माहिती मागवून घेत चार लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी  चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दुसरी घटना सहकारनगर पोलिस ठाण्याच्या परिसरात घडली असून बँकेतून मॅनेजर बोलत असल्याचे सांगत एटीएमचा क्रमांक आणि मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक विचारून बँक खातेदाराचे पावणेतीन लाख काढून घेतले आहेत.  दरम्यान, अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हे दाखल झाले असले तरी ऑनलाईन लुटीचे   हे प्रकार परराज्यातून होत असल्याने फसवणूक झालेल्या ग्राहकांवर हात चोळत बसण्याशिवाय पर्याय राहत नाही.  

भामट्यांची ऑनलाईन लूट

गतवर्षी केंद्र सरकारने केलेल्या ‘नोटबंदी’नंतर  चलनकल्लोळ निर्माण झाला. त्यानंतर  पुण्यासह देशभरात डेबिट व के्रडिट कार्डवरून कॅशलेश व्यवहार करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचा गैरफायदा सायबर भामटे घेत आहेत.  कॉल सेंटरमधून कार्डधारकाला गोपनीय माहिती विचारली जाते. माहिती न दिल्यास कार्ड बंद पडेल, अशी भीती दाखवून पासवर्ड विचारला जातो. अनेक ग्राहक विश्‍वास ठेवून तो शेअर करतात. मात्र काही क्षणात अंकाऊटमधून पैेसे डेबिट झाल्याचा मेसेज आल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकते, असा प्रकार शुंभागी डोंबरे (वय 61, रा. सेनापती बापट रोड) यांच्याशी घडला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकवरून फोन आला. त्याने मी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील क्रेडिट कार्ड विभागाचा एक्झीक्युटिव्ह अधिकारी असून तुमचे क्रेडिट कार्ड रजिस्टर करण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे फोन केला असल्याचे त्याने सांगितले. तसेच, त्यांचा विश्‍वास संपादन करून तुमच्या क्रेडिट व डेबिट कार्डची माहिती त्यांच्याकडून घेतली. त्यानंतर 23 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत वेळोवेळी खात्यावरून ऑनलाईन माध्यमातून खरेदीकरून त्यांची 4 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केली. त्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी प्राथमिक तपास करून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) वैशाली गलांडे या करत आहेत.

दुसरी घटना सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. बँकेतून मॅनेजर बोलत असल्याचे सांगून एटीएमचा क्रमांक आणि त्यावर आलेला ओटीपी क्रमांक घेऊन एकाने पावणेतीन लाख रुपये खात्यातून काढून  घेतल्याप्रकरणी रामजीवन विश्‍वकर्मा (वय 46, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विश्‍वकर्मा यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. दरम्यान त्यांना एका अज्ञात मोबाईलवरून फोन आला. तसेच, मी बँकेतून मॅनेजर बोलत आहे. तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे. ते सुरू करायचे आहे, असे सांगितले. त्यासाठी एटीएमवरून 16 अंकी क्रमांक विचारला. त्यावेळी फिर्यादींनी तो सांगितला. त्यानंतर काही क्षणांत त्यांच्या मोबाईवर 6 अंकी ओटीपी क्रमांक आला. तोही आरोपी व्यक्तीने विचारल्यानंतर फिर्यादींनी सांगितला. 

त्यानंतर आरोपींने तीन दिवस त्यांच्या एटीएमचा वापर करून वेळोवेळी एकूण 2 लाख 85 हजार रुपये काढून घेतले. त्यांना तीन दिवस फोन करून ओटीपी क्रमांक आरोपी घेत होता. त्यांना तीन दिवसानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पुणे पोलिसांच्या सायबर शेखेकडे तक्रार दिली. पोलिसांनी प्राथमिक तपासकरून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहकारनगर पोलिस करत आहेत. 

Tags :  Pune, seven, lakh, rupees, cheats