Sun, May 19, 2019 22:29होमपेज › Pune › ज्येष्ठ महिलेला फेसबुकची मैत्री पडली महागात!

ज्येष्ठ महिलेला फेसबुकची मैत्री पडली महागात!

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 13 2018 1:05AMपुणे : प्रतिनिधी

फेसबुकवरून झालेली मैत्री ज्येष्ठ महिलेला चांगलीच महागात पडली असून, एकाने भारतात आल्यानंतर दिल्ली विमानतळावर कस्टम विभागाने पकडल्याचे सांगून तबल 22 लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी हडपसर भागातील  62 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बेरी ग्रिफिन याच्यावर आयटी अ‍ॅक्टसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सेवानिवृत्त असून, त्या हडपसर भागात कुटुंबासोबत राहतात. त्यांचा मुलगा जर्मनी येथे नोकरीस असतो. त्यांचे स्वत:चे फेसबुकवर खाते आहे. त्यावर ऑक्टोबर 2017 मध्ये बेरी ग्रिफिन नावाच्या व्यक्तीची फ्रेंड रिक्‍वेस्ट पाठवली. त्यांनी ती स्वीकारली. त्यांच्यात चॅॅटवरून बोलणे सुरू झाले. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली.  

मैत्री झाल्यानंतर ते व्हॉट्सअ‍ॅपवर बोलू लागले. आरोपीने मी इंग्लंड येथील असून, व्यवसायाने वकील आहे. तसेच, एक अनाथालय चालवत असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. दरम्यान त्याने एका सामाजिक कार्यासाठी भारतात येणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये फिर्यादी यांना एका महिलेचा दिल्ली येथील विमानतळवरून बोलत असल्याचा फोन आला. तसेच मित्र, बेरी यांना पकडले आहे. त्यांना सोडविण्यासाठी 45 हजार भरण्यास सांगितले. फिर्यादींनी ते भरले. त्यानंतर बेरीला सोडल्याचे सांगितले.

परत दोन दिवसांनी आणखी एका महिलेचा फोन आला. तसेच, कस्टम विभागातून बोलत असून, बेरी यांना मोठ्या परकीय चलनासह पकडल्याचे सांगितले. त्या वेळी आरोपीही त्या महिलेसोबत फिर्यादी यांना बोलला व पकडल्याचे सांगितले. त्यानंतर स्वत:ला व परकीय चलन सोडविण्यासाठी तसेच इतर आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून एकूण 22 लाख 52 हजार रुपये घेतले. त्यानंतर आरोपी फोन उचलत नव्हता. त्या वेळी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक विष्णू पवार करीत आहेत.