Tue, Jul 23, 2019 04:39होमपेज › Pune › आठवडाभरात सेनेची कार्यकारिणी होणार जाहीर

आठवडाभरात सेनेची कार्यकारिणी होणार जाहीर

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 21 2018 11:06PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने संघटनात्मक बांधणीस वेग दिला आहे.  सेनेची पिंपरी- चिंचवड शहर कार्यकारिणी येत्या आठवडाभरात जाहीर होणार असल्याचे समजते विधानसभानिहाय संघटक, समन्वयक या पदांना पक्षाने अधिकृत दर्जा दिला असून या पदांवरही नियुक्त्या  केल्या जाणार आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातलेले लक्ष, शिवसेनेतील गटबाजी, युतीच्या आशेवर बसल्याने युती तुटल्यानंतर प्रचारास मिळालेला कमी वेळ, काहीसे चुकीचे तिकीट वाटप यामुळे सेनेला दारुण पराभवास सामोरे जावे लागले .सेनेला अवघ्या 9 जागा मिळाल्या तर 77 जागा जिंकून भाजपने सत्ता संपादन केली.

महापालिका निवडणुकीनंतर सेनेच्या महापालिकेतील गटनेतेपदी राहुल कलाटे यांची निवड झाली. मात्र स्मार्ट सिटी संचालकपद, स्थायी समिती सदस्यपद, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यपद नियुक्त्यावरून सेनेतील वाद रस्त्यावर आले  शिवसेनेच्या संपर्क नेतेपदी खासदार संजय राऊत यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी संघटनात्मक बदल करण्यास प्राधान्य दिले.  पिंपरी -चिंचवड शहरप्रमुख पदासाठी चाचपणी करण्यात आली.  खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सुलभा उबाळे यांचे तर खासदार श्रीरंग बारणे यांनी योगेश बाबर यांचे नाव सुचवले.  बाबर यांच्या नियुक्तीनंतर बरेच वादळ उठले मात्र ते शांत करण्यात पक्षश्रेष्ठीना काहीसे यश आल्याचे वरवर तरी दिसत आहे.  

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सेनेने संघटनात्मक बांधणीस वेग दिला आहे. येत्या आठवडाभरात शहर कार्यकारिणी जाहीर होणार आहे. कार्यकारिणीत पिंपरी-चिंचवड व भोसरी मतदार संघासाठी प्रत्येकी एक मतदारसंघ प्रमुख, प्रत्येकी दोन उपशहरप्रमुख, प्रत्येकी दोन संघटक ,चार समनवयक यांचा समावेश असणार आहे. तसेच पालिकेच्या प्रत्येक प्रभागास एक विभागप्रमुख याप्रमाणे 32 विभागप्रमुख नियुक्त केले जाणार आहेत यानंतर दुसर्‍या टप्प्यात उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख यांच्या नियुकत्या  केल्या जाणार आहेत.  येत्या आठवडाभरात या नियुक्त्या  होणार असल्याचे समजते.दरम्यान, सेनेचे भोसरी संपर्कप्रमुख हरिषचंद्र ठाकूर यांनी भोसरी मतदार संघात सेनेच्या शाखांना भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेतला सेनेची सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी, प्रभागातील समस्या, याबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी शहरप्रमुख योगेश बाबर हेही उपस्थित होते.