होमपेज › Pune › निगडीपर्यंत मेट्रोचे काम दुसर्‍या टप्प्यात

निगडीपर्यंत मेट्रोचे काम दुसर्‍या टप्प्यात

Published On: Jan 19 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 10:54PMपिंपरी : प्रतिनिधी

पहिल्या टप्प्यातच दापोडी ते पिंपरीच्या पुढे निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत पुणे मेट्रोचे काम करण्यात येणार नाही. दुसर्‍या टप्प्यातच पिंपरी ते निगडीपर्यंतचे काम केले जाईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी (दि.18) स्पष्ट केले. 

पुणे मेट्रोच्या वल्लभनगर येथील स्थानकाचे भूमिपूजन पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर  एसटी आगाराच्या जागेत त्यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, महामेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक रामनाथ सुब्रमण्यम, अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. 

पहिल्या टप्प्यात मेट्रोचे काम निगडीपर्यंत नेण्यात येईल, असे आश्‍वासन महापालिकेचे पदाधिकारी देत आहेत. पालकमंत्र्यांनी हे आश्‍वासन खोडून काढल्याने नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. पालकमंत्री बापट म्हणाले की, पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गिकेच्या डीपीआर तयार करण्यास किमान दहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. केंद्र व राज्याच्या सर्व परवानगी घेऊन पिंपरी ते स्वारगेट व वनाज ते रामवाडी मेट्रोचे काम सुरू झाले आहे. ते काम 100 टक्के पूर्ण झाल्यानंतर दुसर्‍या टप्प्यात सर्व परवानग्या घेऊनच निगडी, कात्रज, सिंहगड रस्ता असा पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये विस्तार करून मेट्रोचे जाळे तयार केले जाईल.निगडीपर्यंतच्या वाढीव कामाच्या खर्चाचा हिस्सा केंद्र व राज्याकडून घेण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. 

मेट्रो या वाहतुक कोंडी सोडविणार्‍या शहराचा रक्तवाहिन्या ठरणार आहेत. सन 2020 पर्यंत प्रत्यक्ष मेट्रो धावेल. शहरात मेट्रोचे काम वेगात सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मेट्रोच्या कामाबाबत मी दर आठवड्यास बैठक घेऊन गती देत आहे. येथील कामाचा दर महिन्यास महापालिका अधिकारी व पदाधिकार्‍यांसमवेत बैठकीत आढावा देण्याची सूचना त्यांनी मेट्रोच्या अधिकार्‍यांना केल्या. कामात येणार्‍या अडचणी सोडविण्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी पदाधिकार्‍यांना केल्या. 

मेट्रोच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केल्याने नागरिकांना कामाची माहिती मिळते. त्यात काही वावगे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वारगेट येथे मेट्रोचे मल्टीपर्पज हब उभे केले जाणार आहे. विविध शासकीय जागा असल्याने जागा ताब्यात घेण्यात विलंब होत आहे. आरक्षित जागा ताब्यात मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेतली जाईल. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील जागेचा प्रश्‍न नसल्याचे त्यांनी सांगितले. 

हॅरिस पुलाजवळून भुयारी मार्ग करणार

हॅरिस पुलावरून पुढे गेल्यास बोपोडी चौकात वाहतूक ठप्प होते. ही कोंडी सोडविण्यासाठी   खडकी बाजाराच्या दिशेने जाणार्‍या मार्गावरील किर्लोस्कर ऑईल इंजिन्स कंपनीच्या बाजूने भुयारी मार्ग विकसित केला जाणार आहे. हे काम सध्या पुलाचे काम करीत असलेल्या ठेकेदाराकडूनच करून घेतले जाईल. त्यामुळे खडकी बाजार आणि भाऊ पाटील रस्त्याने पुणे विद्यापीठाकडे ये-जा करणे सुलभ होणार असल्याचे पालकमंत्री बापट यांनी सांगितले. पुलास अडथळा ठरणार्‍या बोपोडीतील अधिकृत झोपड्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. 

‘मेट्रो’मुळे एसटी आगार होणार चकाचक

मेट्रोचे पहिले अद्ययावत दर्जाचे चकाचक स्थानक वल्लभनगर एसटी आगारात बांधले जाणार आहे; मात्र एसटी आगाराची इमारत जुनी व मळकटलेली आहे. मेट्रो स्थानकासोबत एसटी आगार चकाचक करण्याच्या सूचना पालकमंत्री बापट यांनी मेट्रोच्या अधिकार्‍यांना केल्या. रंगकाम, बांधकाम, सुशोभीकरण, स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. सदर काम करून देण्याची ग्वाही मेट्रोचे रामनाथ सुब्रमण्यम यांनी दिली.