Wed, May 22, 2019 15:01होमपेज › Pune › निमंत्रण पत्रिकांवरच्या खर्चास पालिकेची कात्री

निमंत्रण पत्रिकांवरच्या खर्चास पालिकेची कात्री

Published On: May 14 2018 1:55AM | Last Updated: May 14 2018 1:37AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर 

महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना  दुसरीकडे महापालिकेने काटकसरीच्या धोरणाचा अवलंब करावा. यासाठी पक्षनेते एकनाथ पवार यांनी पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी छापल्या जाणार्या डायर्यांची छपाई यापुढे न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या पाठोपाठ पालिकेच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकांवरच्या खर्चासही कात्री लावण्याचे आदेश सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिले आहेत.आता छापील निमंत्रण पत्रिकांऐवजी संगणकावर काढलेल्या प्रिंट याच निंमत्रणपत्रिका असणार आहेत. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. 

महापालिकेच्या सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाले. भाजपाची सत्ता आली. राष्ट्रवादीला विरोधात बसण्याचा कौल मिळाला. मात्र, ठेकेदारांची बिले काढण्यासाठी कमिशन घेतले जात असल्याची पंतप्रधान कार्यालयाकडे गेलेली तक्रार, नवीन समाविष्ट गावातील 425 कोटीच्या कामात तसेच वेस्ट टू एनर्जी, प्रधानमंत्री आवास योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांनी केलेला आरोप यामुळे भाजपची खूपच बदनामी झाली. भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तरे देण्यात भाजपची शक्ती खर्च झाली. मात्र. नव्याने पालिकेतील सत्ताधारी भाजपाने लोकांची मने पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी नवनवीन फंडे शोधले आहेत. महापालिकेच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांच्या छापील निमंत्रणपत्रिकांच्या खर्चास लावलेली कात्री हे त्याचे उदाहरण आहे. 

महापालिकेच्या वतीने विविध विकास कामांचे भूमीपूजन, उद्घाटन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याच्या निमंत्रणपत्रिका छापण्यासाठी वर्षाला 5 ते 10 लाख रुपये खर्च येतो. कार्यक्रमांचे आयोजन केल्याननंतर महापौरांकडून आयुक्तांना पत्र दिले जाते. नियोजन झाल्यावर निमंत्रणपत्रिकेचे प्रारुप जनसंपर्क विभागामार्फत तयार केले जाते. कार्यक्रमाच्या उंचीनुसार पाचशे ते एक हजार निमंत्रणपत्रिका छापल्या जातात. खासदार, आमदार, पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, पत्रकार यांना या पाठविल्या जातात. मात्र, या पत्रिकांचा गठ्ठा न वाटता पडून राहतो. या प्रकारास लगाम घालण्यासाठी पक्षनेते एकनाथ पवार यांनी पुढाकार घेतला. आता छापील निमंत्रण पत्रिकांऐवजी संगणकावर काढलेल्या प्रिंट याच निंमत्रणपत्रिका असणार आहेत. त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. महापालिकेच्या वतीने येत्या गुरुवारी हेमू कलानी उद्यानात शहीद हेमू कलानी यांचा अर्ध पुतळा सुशोभिकरण करुन बसविण्याच्या कामाचे भूमीपूजन  पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमांच्या निमंत्रणासाठी संगणकावर काढलेल्या प्रिंट मान्यवरांना पाठविण्यात आल्या आहेत.