Thu, Aug 22, 2019 12:45होमपेज › Pune › 11 वी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आज जाहीर होणार

11 वी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आज जाहीर होणार

Published On: Jun 11 2018 1:07AM | Last Updated: Jun 11 2018 12:17AMपुणे : प्रतिनिधी 

अकरावीच्या केंद्रीय समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. यासाठीचे वेळापत्रक शनिवारी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र यंदा मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद या सहा विभागांसाठी एकच वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे हे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सहायक उपसंचालक मिनाक्षी राऊत यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यातून साधारण 2 लाख 46 हजार 855 विद्यार्थी यंदा दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यातील साधारण 70 हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केल्याचे दिसून येत आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमध्ये अकरावी प्रवेश अर्जाचा भाग 1 दहावीच्या निकालापूर्वीच भरला आहे. शुक्रवारी निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी भाग 2 मध्ये निकालामध्ये मिळालेले गुण व महाविद्यालयांचा पसंती क्रमांक आदी माहिती भरण्यास सुरुवात केली आहे. इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांना देखील आता भाग 1 व भाग 2 एकाच वेळी भरता येणार आहे. त्यासाठी शहरातील मार्गदर्शन केंद्रे निश्चित करून दिली आहेत.अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी राबविण्यात येणार्‍या नियमित तसेच विशेष फेर्‍या आणि विविध कोट्यातील प्रवेश यासंदर्भातील वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती देखील राऊत यांनी दिली आहे.