होमपेज › Pune › शहरात सार्वजनिक वैद्यकीय सुविधांचा तुटवडा

शहरात सार्वजनिक वैद्यकीय सुविधांचा तुटवडा

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 06 2018 11:36PMपिंपरी : पूनम पाटील

जागतिक स्तरावर सार्वजनिक आरोग्य सेवा सर्व स्तरातील लोकांना उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहे. शहरात मात्र या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. शासनाच्या माध्यमातून आज सामान्यासांठी व गरीबांसाठी राबविण्यात येणार्‍या अनेक आरोग्य सेवा व आरोग्य विषयक योजना प्रत्यक्ष पुरविल्या जात नाही. महापालिका रुग्णालयात डॉक्टरांच्या व अन्य रिक्‍त पदांचा रुग्णांना तोटा होत आहे. त्यातच शहरातील तीन नद्यांमध्ये जलपर्णी वाढून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. कचर्‍याच्या समस्यांमध्ये वाढ होऊन साथीचे आजार पसरत आहेत.  

अस्वच्छ परिसर व स्वच्छतेअभावी निर्माण होणार्‍या रोगामुळेे रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. शहरातील नद्यांना गटारीचे स्वरुप आले आहे. नद्यांना जलपर्णीचा विळखा पडला असून यामुळे शहरात सर्वत्र डासांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तुलनेने आरोग्य सेवांचा व कुशल डॉक्टरांचा तुटवडा यामुळे पालिकेच्या तसेच शासकीय रुग्णालयांवरही ताण पडला असून या तणावामुळे आज पालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर नोकरी सोडून निघून गेले आहेत. त्याजागी पुन्हा नवीन डॉक्टरांची भरतीच केली जात नाही. यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.  

शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात डॉक्टरांचा तुटवडा असून अन्य अनेक पदेही वर्षानुवर्षे भरलेलीच नाही. त्यामुळे कार्यरत डॉक्टरांवरच सर्व भिस्त येऊन पडली आहे. त्यामुळे अनेकदा रुग्ण दगावल्याचे किंवा रुग्णांची स्थिती गंभीर झाल्याचे प्रकार घडले आहेत. आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाच्या वादामध्ये पालिका रुग्णालयांकडे दुर्लक्ष होत आहे. सामान्य रुग्ण याच ठिकाणी उपचारासाठी येत आहे; मात्र सोयीसुविधा व पुरेशा मनुष्यबळाअभावी त्यांना उपचारांमध्ये दिरंगाई होत आहे. काही रुग्णांना उपचाराअभावीच ‘वायसीएम’ मधून परत जावे लागत आहे; तसेच खासगी रुग्णालयांचा आसरा घ्यावा लागत आहे.

त्यामुळे येथील प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्या कराव्या व रुग्णालयाचा कारभार सुरळीत करावा,  अशी मागणी कर्मचारी वर्गांतून होत आहे. पालिकेच्या ढिसाळ कारभारांमुळे आरोग्याशी निगडीत सर्वच सेवा सुविधा तसेच यंत्रणा राबवण्याबाबत दुर्लक्ष करण्यात येत आहे. वातावरणात होणारे बदल, शहरात वाढता कचरा व संकलनातील त्रुटी, पाणीटंचाई यांसारख्या समस्यांबरोबरच आरोग्याकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे. त्याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरीक व्यक्‍त करत आहेत. 

आरोग्य दिनाचा उद्देश

7 एप्रिल हा जागतिक आरोग्य संघटनेचा हा स्थापना दिवस सर्वत्र जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या संघटनेमध्ये जगातील 192 देश सहभागी झाले. लोकांच्या आरोग्यविषयक जास्तीत जास्त समस्यांकडे लक्ष पुरवणे, हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने ‘सार्वत्रिक आरोग्य सेवांची व्याप्ती - प्रत्येकासाठी व प्रत्येक ठिकाणी’ हे या वर्षीच्या जागतिक आरोग्य दिनाचे घोष वाक्य आहे. 

 

Tags : Pimpri, Pimpri news, public medical facilities, scarcity,