होमपेज › Pune › सत्ताधारीही बोलू लागले प्रशासनाच्या विरोधात 

सत्ताधारीही बोलू लागले प्रशासनाच्या विरोधात 

Published On: Sep 09 2018 2:13AM | Last Updated: Sep 09 2018 2:13AMपिंपरी ः मिलिंद कांबळे 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपचे कारभारी येऊन दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्यापही सत्ताधारी नगरसेवकांची कामे मार्गी लागत नसल्याने सत्ताधारी नगरसेवक संताप व्यक्त करीत आहेत. त्याची प्रचिती  नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत आली. विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी सभेत पालिका प्रशासनावर तोंडसुख घेत अनेक गंभीर आरोप केले. 

महापालिकेत सत्ताधारी नगरसेवकांची कामे अधिकारी तत्पतेने मार्गी लावतात, असा समज आहे. मात्र, सत्ताधारी भाजप नगरसेवकांना उलट अनुभव येत असल्याचे अनेक उदाहरणे समोर येत आहेत. त्यांची संख्या दिवसेदिवस वाढतच चालली आहे. त्याचे पडघम सर्वसाधारण सभेत उमटत आहेत. वर्ष-दीड वर्षे अधिकार्‍यांची मनमानी सहन केल्यानंतर आता नगरसेवक थेट अधिकार्‍यांचे नाव घेऊन बोलू लागले आहेत. त्यातून त्यांच्या मनातील संताप व्यक्त होत आहे. 

पवना धरण 100 टक्के भरून वाहत असताना शहरातील अनेक भागांत पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप तुषार कामठे यांनी केला. अधिकारी हा प्रकार नगरसेवकांना बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. नगरसेवकांचे न ऐकता मुजोर अधिकारी ठेकेदारांसोबत फिरतात, असेही ते म्हणाले. उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी एका विशिष्ट अधिकार्‍यांकडे ढिगभर विभागाच्या जबाबदारी दिल्या गेल्याने कामे रखडल्याचा आरोप केला. सर्व 8 क्षेत्रीय कार्यालयांचे एकत्रित मध्यवर्ती अतिक्रमण विभाग केल्याने कारवाई थंडावल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शिक्षक दिन साजरा न झाल्याबद्दल नगरसेविका प्रियंका बारसे यांनी संताप व्यक्त केला. 

पालिकेने फेरीवाल्यांचे ‘फेक’ बायोमेट्रिक केल्याचा आरोप नगरसेवक केशव घोळवे यांनी केला. टपर्‍यांवर कारवाई करून त्या पुन्हा आहे त्या ठिकाणी उभ्या केल्या जातात. त्यातून अधिकारी निव्वळ कारवाईचे नाटक करीत असल्याचा संताप नगरसेविका सुजाता पालांडे यांनी व्यक्त केला. आर्थिक लांगेबांधे असल्याने अधिकारी अतिक्रमण विरोधी कारवाई करीत नसल्याचा आरोप नगरसेवक हर्षल ढोरे, माई ढोरे, नीता पाडाळे यांनी केला. 

कारवाई करण्यापूर्वी पालिकेचे कर्मचारी संबंधित विक्रेत्यांना फोन करून कळवितात असा गंभीर आरोप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केला. काही गुंड मंडळींशी मिलिभगत करीत अधिकारी चक्क हप्ते वसुली करतात, असाही आरोप अनेक नगरसेवकांनी केला. त्याच प्रकारचे अनेक आरोप स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेतही सत्ताधारी नगरसेवकांकडून केले जात आहेत. 
यावरून गेल्या दीड वर्षात भाजपच्या नगरसेवकांची अधिकार्‍यांवर पकड मजबुत झालेली नसल्याचे स्पष्ट होत आहे. अधिकारी त्याचे ऐकून न ऐकल्या सारखे वागत असल्याचे नाराज नगरसेवक खासगीत बोलतात. कामचुकार व मुजोर अधिकार्‍यांवर कडक कारवाई झाल्याशिवाय इतर अधिकारी व कर्मचारी वठणीवर येणार नाहीत, असे ते स्पष्टपणे बोलत आहेत.