Mon, Jul 15, 2019 23:54होमपेज › Pune › वाहतुकीचा नियम मोडला अन् ‘भानगड’ सापडली!

वाहतुकीचा नियम मोडला अन् ‘भानगड’ सापडली!

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 29 2018 1:02AMपुणे ः नवनाथ शिंदे

हॅलो...पोर्‍या कुठंय रं तू...हाय की कॉलेजला आलोय... गाडी कुठंय...आणलीय की...तुला कॉलेजला जायला गाडी दिलीयं का, वाहतुकीचं नियम मोडायला.. व्हय रं...घरी ये तुला सांगतो. वाहतूक विभागाच्या ट्रॅफिक व्हायलेशन ई-चलन पेमेंट अ‍ॅपवर मुलाचा दुचाकीवर एका मुलीसह वाहतूक नियम मोडल्याचा फोटो पाहून पालकाचा राग अनावर झाला अन् त्यांनी मुलाला फोन करून तंबी दिली.

त्याचं झालं असं की- मुलगा बारावीत गेला; त्यामुळे त्याला कॉलेजला जाण्यासाठी वडिलांनी हौसेने गाडी घेऊन दिली. शुक्रवारी (दि. 24) काही कामानिमित्त वडील विद्यापीठात गेले होते. त्यावेळी काही मुले मोबाईलमध्ये ट्रॅफिक विभागाच्या अ‍ॅपवर स्वतःच्या वाहनांचा क्रमांक नोंदवून दंडाची खात्री करत होते. त्यावेळी आपल्या मुलाच्या गाडीला काही दंड झाला आहे काय? हे अ‍ॅपवर पाहून सांगण्याची विनंती त्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना केली. अ‍ॅपवर वाहन क्रमांक टाकताच मुलाची वेगळीच भानगड पुढे आली.

दुचाकीवर एका मुलीला बसवून झेब्रा क्रॉसिंग नियम उल्लंघनाचा फोटो दिसून आला. हे पाहून संतापलेल्या वडिलांनी मुलाला तत्काळ फोन लावला व  वाहतुकीचा नियम मोडल्याबाबत विचारणा केली.  तसेच गाडीवर मागे बसलेली तरुणी कोण आहे?  अशी विचारणा करत तू घरी ये तुझ्याकडे बघतो, अशा शब्दांत कानउघाडणी केली.

‘व्हायलेशन ई-पेमेंट’ भोवलं!

वाहतूक विभागाने झेब्रा क्रॉसिंग, ट्रीपल सीट, सिग्नल तोडणार्‍यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाने त्यासाठी ट्रॅफिक व्हायलेशन ई-चलान पेमेंट नावाचे अ‍ॅप विकसित केले आहे. त्यावर नियम उल्लंघन केलेल्या वाहनांचा क्रमांक टाकल्यास वाहनचालकाचा फोटो, दंडाची रक्कम, नियम उल्लंघन ठिकाण, कारवाई दिनांकाचा तपशील उपलब्ध होतो. विविध चौकांतील सीसीटीव्हीच्या माध्यमातून बेशिस्त वाहन चालकांच्या वाहनचालकाचा क्रमांक आणि वाहनचालकाचा फोटो कैद केला जातो. त्यानंतर वाहतूक कंट्रोल विभागातून वाहन क्रमांकाच्या तपशिलानुसार वाहन मालकाच्या मोबाईल क्रमांकवर वाहतूक नियम उल्लंघन, दंड पाठविला जातो. क़ारवाईच्या याच पद्धतीमुळे या  तरुणाची ‘भानगड’ बाहेर आली.