Tue, Apr 23, 2019 23:35होमपेज › Pune › दिवसाढवळ्या लूटमार, चोर्‍या वाढल्या

दिवसाढवळ्या लूटमार, चोर्‍या वाढल्या

Published On: May 14 2018 1:55AM | Last Updated: May 14 2018 12:36AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारांनी चांगलेच डोकेवर काढले आहे. शहरात भरदिवसा लुटमार करुन लाखो रुपये चोरुन नेणे तसेच दिवसा घरफोडी करणे हे प्रकार वाढत आहेत. विशेष म्हणजे लुटमारीच्या प्रकारात जवळचे तसेच पुर्वी कामाला असणार्या कर्मचार्यांचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. पोलिस अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणत आहेत मात्र ते थोपवणे पोलिसांसमोर मोठे आवाहन आहे.

दहा दिवसांपुर्वी निगडी येथील यमुनानगरमध्ये कॅशव्हॅन कर्मचार्यावर चाकूने हल्ला करून 25 लाख टोळीने लुटले. या टोळीला गुन्हे शाखेने आठ दिवसामध्ये पकडून त्यांच्याकडून 25 लाखापैकी 13 लाख 52 हजार रुपयांची रोकड जप्त केली. यामध्ये राहुल संग्राम वाघमारे, महादेव लिंबाजी खापरे, सागर उर्फ बाळा रामचंद्र खताळ या चोरट्यांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या टोळीत पूजा चव्हाण या मुलीचाही समावेश आहे. यापुर्वी अशाच प्रकारे वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घटना घडलेली होती.  पिंपळे सौदागर परिसरातून 75 लाख रुपयांची रोकड चोरीला गेली होती. कॅश घेवून जाणार्या वाहन चालकानेच ही रक्कम पळवली होती. त्यानंतर हे वाहन भोसरी येथे सोडले तर पैशे काढून पैशाची पेटी शिक्रापूर येथे टाकून पलायन केले होते. वाकड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 24 तासात चोरट्यांना ताब्यात घेतले. शेतामध्ये पुरलेले पैसे हस्तगत केले. वाकड पोलिसांनी 72 लाख रुपये जप्त केले. यामध्ये सर्व वाहन चालकाचा समावेश होता. अशा प्रकारच्या घटना यापुर्वीही शहरात घडलेल्या आहेत. 

यमुनानगर येथील गुन्ह्यात अटक केलेल्या राहूल याने यापुर्वी कोंढवा येथे कॅश लुटल्याचा बनाव केला होता. त्यावेळी गुन्ह्यात न अडकल्यामुळे मित्रांच्या मदतीने पुन्हा लूटमार करण्याचे त्याने धाडस केले. पिंपळे गुरव परिसरात राहते घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील दहा हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. हा प्रकार शनिवारी (दि. 12 मे) भरदिवसा सकाळी नऊ ते सायंकाळी सहा यावेळेत घडला. शहरात दिवसा घरफोड्यांचेही प्रकार वाढत आहेत. अशा प्रकारे लुटमार आणि दिवसा घरफोडीचे प्रकार शहरात वाढत आहेत. वर्दळीच्या ठिकाणाहून असे बनाव केले जात आहेत.

नागरिकात भीतीचे वातावरण

स्थानिक पोलिस किंवा गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून गुन्हे उघडकीस आणले जात आहेत. मात्र हे अटोक्यात आणण्यात  पोलिसांना यश येत नाही. सर्वसामान्यांनी पै पै करुन जमा केलेल्या किंमती वस्तूवर डल्ला मारुन आयुष्याची पुंजी चोरटे घेवून पसार होत आहेत. शहरात भरदिवसा असे प्रकार होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.