होमपेज › Pune › लष्कराने बंद केलेले रस्ते होणार खुले

लष्कराने बंद केलेले रस्ते होणार खुले

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 22 2018 12:51AMपुणे : प्रतिनिधी 

सुरक्षिततेच्या कारणास्तव पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डासह देशातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील रस्ते लष्कराने बंद केले होते. आता मात्र हे रस्ते नागरिकांच्या वाहतुकीसाठी लागलीच खुले करावेत, असा निर्णय केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. याबाबत  संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याबरोबर देशातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डांचे उपाध्यक्ष आणि त्या भागाचे खासदार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. ही बाब लक्षात घेऊन आता पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील घोरपडी येथील इलाइट लाइन आणि वानवडी बाजार भागातील राईट फ्लँक हे दोन्ही रस्ते लवकरच खुले होणार आहेत. 

केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याबरोबर 4 मे रोजी देशातील सर्व कॅन्टॉन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष आणि संबंधित खासदार यांच्याबरोबर नागरी प्रश्नांबाबत दिल्लीत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये कॅन्टोन्मेंट भागात असलेल्या स्थानिक लष्कराने बंद केलेल्या रस्त्यांचा मुद्दा सर्वच बोर्डांच्या पदाधिकार्‍यांनी मांडला. सुरक्षेच्या कारणास्तव बोर्डाच्या हद्दीतील काही रस्ते बंद केले होते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, अशा तक्रारींची बाब गांभार्याने घेऊन  संरक्षण मंत्री सीतारामन यांनी लष्करप्रमुख बिपीन रावत, संरक्षण सचिव संजय मित्रा आणि लष्कराच्या इतर वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षा व इतर कारणास्तव कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील बंद करण्यात आलेले रस्ते नागरिकांसाठी तत्काळ खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर लागलीच मंत्रालयाने 20 मे रोजी आदेश जारी केला आहे.