Sun, Aug 18, 2019 20:50होमपेज › Pune › नेत्यांबद्दल आस्था पण..गटबाजीमुळे कुचंबणा

नेत्यांबद्दल आस्था पण..गटबाजीमुळे कुचंबणा

Published On: Mar 21 2018 2:10AM | Last Updated: Mar 21 2018 1:12AMवडगाव मावळ : गणेश विनोदे 

मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँगे्रसमधील गटबाजीचा परिणाम म्हणून पक्षाच्या जेष्ठ नेत्यांबद्दल आस्था असूनही बहुतांश कार्यकर्त्यांची केवळ गटबाजीच्या राजकारणामुळे मोठी कुचंबणा झाल्याचे चित्र पक्षाचे जेष्ठ नेते मदन बाफना व बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने दिसून आले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच मावळ तालुक्यात ‘गटबाजी‘ ही पक्षाला लागलेली एक ‘किड‘ असून दोन मोठ्या नेत्यांच्या संघर्षामध्ये सुरु झालेल्या या गटबाजीचे रुपांतर प्रत्येक नेत्याचा एक गट होईपर्यंत झाले असून आता प्रत्येक गावात वेगवेगळे गट झाले आहेत. पक्षाकडे मदन बाफना, कृष्णराव भेगडे, माऊली दाभाडे, बबनराव भेगडे, बाळासाहेब नेवाळे, बापूसाहेब भेगडे, राजाराम राक्षे, विठ्ठलराव शिंदे, गणेशआप्पा ढोरे, गणेश खांडगे अशा मातब्बर नेत्यांसह क्रियाशील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची फौज होती. परंतु, कोणीही एकमेकांचे नेतृत्व मानायला तयार नसल्याने प्रत्येकाचे वेगळे गट तयार झाले. 

आता प्रत्येक गावात पक्षाच्या विविध नेत्यांना मानणारा वर्ग आहे. याचा परिणाम स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत, सोसायटीसारख्या निवडणूकांवर झालेलाही पहायला मिळत असून काही ठिकाणी तर भावकी-भावकीच नव्हे तर भावा-भावात भांडणे होण्यापर्यंत ही गटबाजी कारणीभूत ठरली आहे.या गटबाजीचा प्रत्यय सोमवारी दिसून आला, एकेकाळी मदन बाफना व त्यांचे खास समर्थक म्हणून परिचित असलेले बबनराव भेगडे यांचा वाढदिवस अनेकदा एकाच व्यासपीठावर साजरा झाला, दोघे एकमेकांना शुभेच्छाही देत होते, कार्यकर्ते एकाच फ्लेक्सवर दोघांना शुभेच्छा देत होते. सोमवारी मात्र शुभेच्छा देण्यासाठी काही कार्यकर्ते बाफना यांच्याकडे तर काही कार्यकर्ते भेगडे यांच्याकडे जाताना दिसत होते.

तर, दोन्ही नेत्यांची आस्था आहे परंतु, एकाकडे गेले तर दुसर्‍याला राग येईल अशा कुचंबनणेत अडकलेल्या काही कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांकडे जाणे टाळले. तर काही हुशार कार्यकर्ते दोन्ही नेत्यांना भेटले मात्र सोशल मिडियावर फोटो व्हायरल करणे मात्र जाणीवपूर्वक टाळले. एकंदर या वाढदिवसाच्या निमीत्ताने कार्यकर्त्यांना नेत्यांबद्दल आस्था आहे परंतु, गटबाजीमुळे त्यांची कुचंबना होत असल्याचे चित्र समोर आले. यावरुन गटबाजीमुळेच कार्यकर्त्यांची मोठी अडचण होत असल्याचे दिसले.

Tags : pune, pune news, The result, grouping, NCP Congress, Mawal taluka