Fri, Apr 19, 2019 08:47होमपेज › Pune › पुणे विभागातही मुलींचाच बोलबाला

पुणे विभागातही मुलींचाच बोलबाला

Published On: Jun 09 2018 1:36AM | Last Updated: Jun 09 2018 12:53AMपुणे ः प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च (2018) मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. 8) जाहीर झाला. या परीक्षेत पुणे विभागाचा निकाल 92.08 टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात किंचित सुधारणा झाली असून, गेल्या वर्षी दहावीचा निकाल 91.95 टक्के एवढा लागला होता. यावर्षी पुणे विभाग राज्यात तिसर्‍या स्थानावर आहे. पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे विभागात पुणे जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 92.99 टक्के आहे.

इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला. पुणे विभागातून 2 लाख 68 हजार 88 विद्यार्थी दहावी परीक्षेला बसले होते. त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 46 हजार 855 इतकी आहे. विभागात या वर्षी पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. विभागात यावर्षी 1 लाख 19 हजार 851 विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी 1 लाख 13 हजार 139 मुली उत्तीर्ण झाल्या असून, विभागात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 94.40 टक्के आहे, तर विभागातून 1 लाख 48 हजार 237 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 1 लाख 33 हजार 716 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विभागात मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 90.20 टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 4.2 टक्क्यांनी जास्त आहे. विभागातील तीनही जिल्ह्यांत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असून, यंदाही निकालात मुलींचे वर्चस्व कायम राहिले आहे.

विभागातील तब्बल साडेअकरा हजार 901 विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. राज्यात कोकण, कोल्हापूर विभाग पुण्यापेक्षा सरस ठरले असून, कोकण विभागाचा निकाल 96 टक्के, तर कोल्हापूर विभागाचा निकाल 93.88 टक्के लागला आहे. विभागातून 15 हजार 922 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 7 हजार 286 असून, उत्तीर्णतेची निकालाची टक्केवारी 45.76 आहे.