Tue, Jul 23, 2019 11:42होमपेज › Pune › खुशखबर : बारावीचा निकाल वेळेतच लागणार

खुशखबर : बारावीचा निकाल वेळेतच लागणार

Published On: Apr 10 2018 7:11PM | Last Updated: Apr 10 2018 7:11PMपुणे : प्रतिनिधी 

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी सोमवारी (दि. ०९) शिक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने हे आंदोलन स्थगित केले. महासंघाद्वारे बारावीच्या उत्तरपत्रिका बोर्डात जमा न करण्यासाठी पुकारलेले आंदोलन स्थगित करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी केली. यामुळे राज्यातील बारावी परीक्षेच्या तपासलेल्या ८० लाख उत्तरपत्रिका बोर्डाकडे जमा केल्या जाणार असून बारावीचा निकाल वेळेत लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी डिसेंबर २०१७ महिन्यापासून आपल्या विविध मागण्यांसाठी टप्याटप्याने आंदोलन पुकारले आहे. मात्र, राज्य शासनाद्वारे मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन देऊनही दिलेल्या मुदतीत मागण्यांचे आदेश न काढल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी राज्यातील सुमारे १५ लाख बारावीच्या विद्यार्थ्याच्या तपासलेल्या ८० लाख उत्तरपत्रिका बोर्डात जमा न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. 

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार ५ जूनपूर्वी बारावीचा निकाल लागणे अपेक्षित आहे. मात्र, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या बहिष्कार आंदोलनामुळे हा मुहूर्त सुटणार अशी चर्चा शिक्षण क्षेत्रात वर्तविण्यात येत होती. दरम्यान, सोमवारी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि महासंघाचे अनेक पदाधिकारी यांच्यासोबत सोमवारी (दि. ०९ ) झालेल्या बैठकीत मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर बारावीच्या उत्तरपत्रिका बोर्डात जमा न करण्याचे पुकारलेले आंदोलन स्थगित करत तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डात जमा करण्याचे जाहीर केले. त्यामुळे बारावीचा निकाल वेळेत लागण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे महासंघाने जाहीर केले. 

याबाबत महासंघाचे अध्यक्ष अनिल देशमुख म्हणाले की, सोमवारी (दि. ०९) रोजी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मागण्या मान्य करण्यात आल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. या बैठकीत मूल्यांकन झालेल्या कायम विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची यादी ऑनलाइन जाहीर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच २०१२ पासून नियुक्त व ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या सर्व शिक्षकांना तातडीने नियुक्ती मान्यता देण्यात येणार आणि कायम विना अनुदानीतची मूल्यांकणास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी ऑनलाइन जाहीर करणे आदी मागण्या मान्य केल्याचे पत्रक शासनाद्वारे काढण्यात आले. तसेच १७१ वाढीव पदांवरील शिक्षकांच्या वेतनाच्या तरतुदीसाठी व अर्थ खात्याशी संबंधीत इतर मागण्यांसाठी दि. १७ एप्रिल रोजी राज्याचे अर्थमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करुन निर्णय घेण्याचे मान्य करण्यात आल्याची माहिती देशमुख यांनी दिली. 

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्याचे परिपत्रक काढल्यामुळे आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्याचे शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत. आज पासून (दि. १०) नियामक (मॉडरेटर्स) तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डात जमा करत आहेत.त्यामुळे  १२ वीचा निकाल वेळेवर लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. - प्रा. अनिल देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ. 

 

Tags : pune, pune news, HSC, result, Junior College Teachers Federation, agitation,