Mon, Jun 17, 2019 02:11होमपेज › Pune › भाडेवाढ झाली; सुविधांचे काय?

भाडेवाढ झाली; सुविधांचे काय?

Published On: Jun 29 2018 12:57AM | Last Updated: Jun 28 2018 11:14PMपिंपरी : पूनम पाटील

प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी’ असे प्रत्येक बसवर लिहिलेले असते. हा खर्‍या अर्थाने सार्वजनिक उपक्रम आहे. या दृष्टीने समाजातील काही घटकांना एसटीच्या वतीने सवलतीही देण्यात आल्या. परंतु, प्रवाशांना जास्तीत जास्त सेवा सुविधा पुरवणे तर दूरच राहिले, याउलट इंधन दरवाढ, सुट्या भागांचे वाढलेले दर, महागाई तसेच कामगारांबरोबरचा वेतनकरार या सर्वांची कारणे देत नुकतीच एसटी प्रवास भाड्यात 18 टक्के  वाढ करण्यात आली. त्यामुळे सर्व आर्थिक भार प्रवाशांच्या डोक्यावरच का, असा सवाल प्रवासी करत आहेत. तसेच भाडेवाढ झाली; परंतु इतर सुविधांचे काय, असा सवाल प्रवासी करत आहेत. 

वर्षानुवर्षे समाधानकारक वेतनवाढ न झाल्याने एसटी कामगार असंतुष्ट होता. त्यामुळे वेतनकरार आवश्यक होता. परंतु; प्रवाशांच्या खिशावर शासनाने डल्ला मारुन सोपा मार्ग निवडला आहे. ‘वाट पाहीन पण एसटीने जाईन’ या प्रवाशांच्या स्वप्नाला भाडेवाढीने छेद दिला असून प्रवाशांना खासगी वाहतुकीकडे वळण्यास भाग पाडले आहे. प्रदुषणावर उत्तम पर्याय म्हणून खासगी वाहनांची संख्या कमी करुन सार्वजनिक सेवेवर जगभरात भर देण्यात येत आहे. मात्र, या भाडेवाढीमुळे या उद्देशालाच हरताळ फासला आहे.  काळाच्या ओघात एसटीचा पर्याय निवडावा का असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. 

सामान्यांना परवडणारे वाहन म्हणून एसटीची ओळख नाहीशी होतेय का़? 

इंधन दरवाढ व इतर कारणे असले तरी सामान्यांना परवडणारे वाहतूक साधन म्हणून एसटीची ओळख पुसत चालली आहे. खरेतर घसघशीत अशी 30 टक्के अशी भाडेवाढ प्रस्तावित होती; परंतु ती कमी करुन 18 टक्के करण्यात आली. त्यामुळे प्रवासी थोडक्यात बचावले असले तरीही एसटीसाठी खास माफक दरात इंधन उपलब्ध करुन देणे व टोलमधून लालपरीला वगळणे या गोष्टी शासनाला सहज शक्य होत्या. मात्र, भाडेवाढीचा पर्याय निवडून हा सगळा भार प्रवाशांवर टाकला. अनेक गरजू प्रवासी केवळ एसटीनेच प्रवास करतात. त्यांना आता आर्थिक भुर्दंड बसणार असून त्यांनी जायचे कोठे, असा सवाल प्रवासी संघाच्या वतीने करण्यात आला आहे. 

लालपरीला टोलमुक्त करायला हवे होते...भाडेवाढ का ?

महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे वचन सरकारला पाळता आले नाही;  परंतु कमीत कमी एसटीला तरी टोलमधून सूट द्यायला हवी होती. त्यामुळे काहीसा बोजा कमी झाला असता. टोलमधून सवलत तर सोडाच; टोलमध्ये वाढच केल्याने एसटीला आर्थिक फटका बसला आहे. एसटीला जवळपास 95 टक्के महसूल प्रवाशांकडून मिळतो. त्यामुळे भाडेवाढ हा तोटा भरुन काढण्यासाठी सोपा पर्याय असेलही; परंतु भाडेवाढीमुळे हा महसूल देणारा प्रवासी वर्ग आता एसटीच्या वाहतुकीचा पर्याय टाळून खासगी वाहतुकीच्या पर्यायाला पसंती देत आहे. त्यामुळे भाडेवाढ करून नेमके काय फलित होणार आहे, असा सवाल प्रवासी व या क्षेत्रातील जाणकारांनी केला आहे.