Thu, Aug 22, 2019 11:12होमपेज › Pune › सिमेन्सच्या उर्वरित रेकची अद्यापही प्रतीक्षाच

सिमेन्सच्या उर्वरित रेकची अद्यापही प्रतीक्षाच

Published On: Dec 08 2017 1:42AM | Last Updated: Dec 07 2017 11:43PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

मुंबईतून पुण्यात दाखल होणार्‍या सिमेन्सच्या उर्वरित रेकची प्रवाशांना अद्यापही प्रतीक्षाच करावी लागत आहे. 11 नोव्हेंबर रोजी मुंबईतून सिमेन्सचा रेक पुणे यार्डात दाखल झाला. त्यानंतर सिमेन्सचे आणखी तीन रेक महिनाभरात दाखल होतील, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

प्रत्यक्षात मात्र महिना उलटत आला, तरी अद्यापही हे रेक दाखल झाले नसून, यामुळे  ना रेक वाढले, ना फेर्‍यांची संख्या वाढली, असे चित्र दिसत आहे. यामुळे पुणे-लोणावळा-पुणे मार्गावरील प्रवाशांच्या पदरी सध्या तरी निराशाच पडली असून, त्यांचे हाल सुरूच आहेत. 

पुणे-लोणावळा-पुणे मार्गावर लोकलच्या सध्या 40 फेर्‍या होतात. दोनच दिवसांपूर्वी पुणे-तळेगाव व तळेगाव-पुणे दरम्यान मध्यरात्री सुटणार्‍या दोन लोकल प्रवाशांची गर्दी नसल्याचे कारण सांगून कायमच्या बंद करण्यात आल्या. यामुळे मध्यरात्रीनंतर दोन्ही दिशेला जाणार्‍या प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू झाले असून, रेल्वे प्रशासनाला मात्र याचा काहीच गंध नाही. गेल्या पंधरवड्यात लोणावळा लोकल सेवेचे तीनतेरा वाजले असून, अनेक लोकल रद्द करण्यात आल्या. 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी चिंचवड स्थानकात सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे लोकलचे संपूर्ण वेळापत्रकच कोलमडले, तर 3 डिसेंबर रोजी विशेष ब्लॉक ठेवण्यात आल्याने सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान लोकलअभावी प्रवाशांची पुरती दैना झाली.  त्याचप्रमाणे 4 डिसेंबर रोजी खडकी येथे सकाळी सहाच्या सुमारास

पुण्याहून लोणावळ्याला जाणार्‍या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने त्याच्या पाठीमागून येणार्‍या अनेक लोकल रद्द कराव्या लागल्या. भरीस भर म्हणून रेल्वेच्या वतीने 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान दुपारच्या वेळेत लोहमार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकरिता ब्लॉक ठेवण्यात आल्याने अनेक लोकल महिनाभर रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे दुपारच्या प्रवाशांची पुरती पंचाईत होत आहे. दरम्यान, सिमेन्सचे उर्वरित तीन रेक कधी दाखल होतात, त्याचप्रमाणे ते दाखल झाल्यानंतर फेर्‍यांची संख्या वाढणार का, हे प्रश्‍न सध्या तरी अनुत्तरितच आहेत.