Mon, Jun 17, 2019 02:21होमपेज › Pune › तायक्वांदो ब्लॅक बेल्टसाठी विक्रमी सहभाग

तायक्वांदो ब्लॅक बेल्टसाठी विक्रमी सहभाग

Published On: Feb 19 2018 1:37AM | Last Updated: Feb 19 2018 12:35AMपुणे : प्रतिनिधी

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा संकुलात आयोजिलेल्या तायक्वांदो ब्लॅक बेल्ट परीक्षेत 542 खेळाडू व राष्ट्रीय पंच परीक्षेत 241 प्रशिक्षकांनी विक्रमी सहभाग नोंदविला. 

महाराष्ट्रातील आजवरच्या इतिहासातील हा विक्रमच आहे. जागतिक तायक्वांदो महासंघाचे (डब्ल्यूटीएफ) सेऊल (दक्षिण कोरिया) येथील मुख्यालय कुक्कीऑनच्या मान्यतेने जगभर ब्लॅक बेल्ट परीक्षा घेण्यात येतात. भारतीय तायक्वांदो महासंघाचे (टीएफआय) अध्यक्ष चेतन आनंद, सचिव प्रभात शर्मा यांच्या आदेशाप्रमाणे पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल (बालेवाडी) येथे नुकत्याच या शिबिराचे आयोजन केले होते.

तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे प्रभारी अध्यक्ष व छत्तीसगड तायक्वांदो असोसिएशनचे महासचिव रामपुरी गोस्वामी, समितीचे सदस्य दीपक शिर्के व सुभाष नायर यांच्या अधिपत्याखाली या परीक्षेचे आयोजन केले होते. गुजरात राज्य तायक्वांदो असोसिएशनचे सचिव व टीएफआयचे सदस्य सुरेश परमार, आंतरराष्ट्रीय पंच व राजस्थान तायक्वांदो असोसिएशनचे उपाध्याय संजय देवनात व झारखंडचे अमर भोरी यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवछत्रपती पुरस्कारविजेते प्रवीण बोरसे, अविनाश बारगजे, अजित घारगे, बालाजी जोगदंड, विजय कांबळे, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील सचिव, पदाधिकारी व प्रशिक्षकांनी परिश्रम घेतले.