Thu, Apr 25, 2019 07:30होमपेज › Pune › पालिका प्राणिसंग्रहालयातून दुर्मिळ घुबडाची तस्करी

पालिका प्राणिसंग्रहालयातून दुर्मिळ घुबडाची तस्करी

Published On: Jul 04 2018 2:18AM | Last Updated: Jul 04 2018 12:54AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संभाजीनगर, चिंचवड येथील बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालय येथे जखमी अवस्थेतील दुर्मिळ जातीचे घुबड उपचारासाठी दाखल झाले होते. सदर घुबड दुर्मिळ असून, ते शहरातील नागरिकांना पाहण्यासाठी प्राणिसंग्रहालयात ठेवावे, अशी सूचना करूनही तो वैयक्तिक नावाने परस्पर पुणे पालिकेच्या कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाकडे हस्तांतरित केला आहे. सदर पक्षी पालिकेचा नावाने हस्तांतरित न करण्यामागे तस्करीचा प्रकार आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम यांनी मंगळवारी (दि. 3) पत्रकार परिषदेत केला. याच पद्धतीने अजगर, सर्प, कासव, किंग क्रोबा व मगरीची तस्करी झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. 

पालिका भवनातील विरोधी पक्षनेते दालनात झालेल्या परिषदेत विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादी महिला आघाडीचा शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक जावेद शेख आदी उपस्थित होते. कदम म्हणाल्या की, सदर प्राणीसंग्रहालय विस्तारीकरणाचे सुरू आहे. गेल्या वर्षी 23 ऑगस्टला अजगर चोरीचा प्रकार घडला होता. त्या संदर्भात पालिका सभागृहात सदस्यांनी तक्रारी मांडल्या. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तपास करून कारवाईची गरज होती. मात्र, आयुक्तांनी वर्ष उलटूनही त्यासंदर्भात काहीची कारवाई केलेली नाही. 

असा परिस्थितीमध्ये आता दुर्मिळ जातीच्या घुबडाचा तस्करीचा विषय समोर आला आहे. पतंगाचा मांजामध्ये अडकून जखमी झालेला घुबड प्राणीसंग्रहालयात उपचारासाठी दाखल झाला होता. हा पक्षी दुर्मिळ असून, तो केवळ सिंगापूर येथील प्राणीसंग्रहालयात आहे. पक्षी विकत आणण्यापेक्षा उपचार पूर्ण होऊन बरा झाल्यानंतर नागरिकांना पाहण्यासाठी तो येथेच ठेवावा, असा सूचना दिल्या होत्या. मात्र, ते घुबड कात्रजच्या प्राणी संग्रहालयात पाठविल्याचे सर्पोद्यानाचे केअरटेकर दीपक सावंत यांनी सांगितले. 

कात्रजच्या प्राणीसंग्रहालयाकडे त्याबाबत चौकशी केली असता. पालिकेच्या वतीने कोणत्याही घुबड दाखल करण्यात आलेला नाही. शाहीद शेख यांच्या नावाने ते घुबड 4 जूनला दाखल केल्याची नोंद रजिस्टरमध्ये आहे. सदर दुर्मिळ पक्षी पालिकेच्या नावाने कात्रजकडे हस्तांतरीत का केला गेला नाही. त्यामुळे यामध्ये घुबडाची तस्करी करण्याचा प्रकार असल्याचा आरोप कदम यांनी केला. प्राणीसंग्रहालयात या पूर्वी अजगर, सर्प आणि मगरी गायब झाले असून, त्यामध्येही तस्करीचा प्रकार आहे. या प्रकरणात प्राणीसंग्रहालयातील अधिकारी व कर्मचारी सामील असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणाची आयुक्तांनी चौकशी करून दोषी अधिकार्‍यास निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

तो पक्षी पालिकेचा नाही

सर्पमित्र शाहीद शेख यांना मत्स्य जातीचा (ब्राउन फिश) घुबड मांजामुळे जखमी अवस्थेत देहू-तळेगाव परिसरात मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात आढळून आला. पूर्ण वाढ झालेला या पक्ष्याचा एक पंख तुटलेला होता. हा पक्षी देहू, तळेगाव परिसरात आढळतो. तो त्यांनी सर्पोद्यानात उपचारासाठी दाखल केला.  उपचारादरम्यान त्याचा एक पंख कापावा लागला. सर्पोद्यानात या मोठ्या आकाराच्या पंख्याचा घुबड्यासाठी पिंजरा नाही. तसेच, राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार हा पक्षी संग्रहालयात ठेवण्यास मान्यता नाही. त्यामुळे पुढील उपचारासाठी घुबडाला कात्रजच्या प्राणिसंग्रहालयात पाठविले. आपल्याकडे वाहन नसल्याने शेख यांनीच तिकडे पक्षी दाखल केला. सदर पक्षी पालिकेचा नाही. मात्र, भविष्यात सुविधा उपलब्ध झाल्यानंतर तो आपल्याकडे आणता येऊ शकतो, असे पालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी सांगितले.