Tue, Jul 16, 2019 00:10होमपेज › Pune › ‘मोबाईल कव्हर’च्या विल्हेवाटीचा प्रश्‍न

‘मोबाईल कव्हर’च्या विल्हेवाटीचा प्रश्‍न

Published On: Apr 25 2018 11:54PM | Last Updated: Apr 25 2018 11:41PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच मोबाईल तंत्रज्ञान बदलत गेले. नवनवीन सुविधा असणारे मोबाईल हँडसेट बाजारात दाखल झाले  आहेत. आजही क्षणाक्षणाला काही नवीन घेऊन येणारे मोबाईल हँडसेट ग्राहकांना आकर्षित करत आहेत; परंतु जुन्या मोबाईलच्या कव्हरसह ई कचर्‍याचाही मोठा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. बंद झालेल्या हँडसेटच्या कव्हरचा खच विक्रेत्यांकडे पडून आहे. या कचर्‍याचे करायचे काय असा प्रश्‍न विक्रेत्यांना पडला आहे.

मोबाईल नवीन आला तेव्हा भले मोठे हँडसेट, इन्कमिंगसाठीही चार्जेस अशी स्थिती होती. पुढे छोटे हँडसेट आले. त्यात रेडिओ, मेमरी कार्ड आदी सुविधा उपलब्ध झाल्या. स्मार्ट फोन बाजारात आले अन् लोकांना मोबाईल वेडाने झपाटले. फेसबुक, व्हाट्सअप यांसारख्या सोशल मीडियाचा वापर मोबाईलच्या माध्यमातून सुरू झाला. इन्कमिंग, आऊटगोईंग, नेट वापर यासाठी मोबाईल नेटवर्किंग सुविधा देणार्‍या कंपन्यांनी स्कीमचा मारा केल्याने प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसू लागला.

मार्केटमध्ये नोकिया, सॅमसंगबरोबरच अनेक चायनीज कंपन्यांचे स्मार्ट मोबाईल अधिकाधिक सुविधांसह दाखल होऊ लागले. अधिकाधिक क्षमतेची बॅटरी, अधिकाधिक रॅम, फास्ट प्रोसेसर, अधिकाधिक मेमरी, अधिक क्लेअरिटी देणारा कॅमेरा, आकर्षक लुक ही मोबाईल शौकिनांची गरज लक्षात घेऊन मोबाईल हँडसेट उत्पादन करणार्‍या कंपन्यांनी एकापेक्षा अधिक सरस हँडसेट बाजारात आणण्यास सुरुवात केली.एकीकडे नवनवीन हँडसेट बाजारात येत असताना दुसरीकडे मोबाईलच्या सुरक्षेसाठी कव्हर बाजारात येऊ लागले आहेत.  मोबाईलचे कव्हर विक्री करणारी मोठी बाजारपेठ तयार झाली. सोबर कव्हरपासून तरुणाईला आकर्षित करेल अशी अधिकाधिक सुंदर, आकर्षक प्लास्टिक कव्हर्स बाजारात आली ; मात्र नवीन मोबाईल बाजारात झेपावत असताना जुन्या मोबाईलच्या कव्हरच्या ई कचर्‍याचा प्रश्न निर्माण होत आहे.

नवीन हँडसेट बाजारात आणले की, जुन्या मोबाईल हँडसेटचे उत्पादन कंपन्या बंद करतात. अशा बंद झालेल्या हँडसेटच्या कव्हरचा विक्रेत्यांकडेही मोठा कचरा झाला आहे. हजारात एखादा ग्राहक जुन्या हँडसेटसाठी कव्हर विकायला आला. तरच, अन्यथा हा ढिगारा विनाकारण सांभाळत बसण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे. शासनाने प्लॅस्टिकवर बंदी घातल्याने प्लास्टिक कव्हर विकण्यावर काही दिवसांनी का होईना कडक निर्बंध निश्चितच लादले जाणार आहेत; परंतु तोवर या जुन्या हँडसेटच्या कव्हरच्या ई कचर्‍याची विल्हेवाट कशी लावणार हाच मोठा प्रश्न आहे.

Tags : Pimpri, question, disposal, mobile, cover