Mon, May 20, 2019 10:49होमपेज › Pune › ‘भंगार वाहन विधेयका’चे ‘घोंगडे’ भिजत पडू नये

‘भंगार वाहन विधेयका’चे ‘घोंगडे’ भिजत पडू नये

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 08 2018 1:18AMपुणे : भाग्यश्री जाधव

रस्तोरस्ती पडलेल्या आणि त्यामुळे वाहतूककोंडी,  प्रदूषण, अपघात आदी संकटांना निमंत्रण देत असलेल्या टनांवारी वाहनांचे काय करायचे, त्यांची विल्हेवाट कशी लावायची, त्याची जबाबदारी नेमकी कुणाची, अशा प्रश्नांची दखल पालिकेपासून केंद्र सरकारपर्यंत सर्वच प्रशासकीय यंत्रणांना लवकरात लवकर घेणे आवश्यक बनले आहे. महाराष्ट्र राज्य पातळीवरील आढाव्यापाठोपाठ पुण्याच्या उपनगरांतील भंगार वाहनांचा आढावा घेतला असता हे वास्तव ठळकपणाने समोर आले. 

घरटी एखादे वाहन ही कल्पना एकविसाव्या शतकात झपाट्याने मागे पडली आणि अवघ्या दहा-पाच वर्षांत ती माणशी दोन वाहने या वास्तवापर्यंत कशी पोचली, याचे उदाहरण म्हणजे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरे. याचबरोबर जेमतेम दहा-पंधरा वर्षे वापरून किंवा अन्य कारणांनी नकोशा झाल्याने भंगारात फेकून दिल्या जाणार्‍या वाहनांची समस्या उग्र होत गेली. त्याचा निचरा करण्याबाबत नुकताच केंद्रीय पातळीवर विचार सुरु झाला असून, विधेयक बनविण्यात येत असल्याचे वृत्त आहे. मात्र ते लाल फितीत अडकून पडू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत असल्याचे या पाहणीत आढळून आले.

बेवासर वाहने सर्रासपणे रस्त्याच्या कडेला लावली जात आहेत. यामुळे आता सांस्कृतिक वारसा असेलेले पुणे शहर बेवारस वाहनांचे जंगल बनत चालले आहे.  नियमानुसार ही वाहने संबंधित मालकाने रिन्यू किंवा स्क्रॅप करणे गरजेचे आहे. मात्र, वाहने स्क्रॅप करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा नसल्याने हे मालकही ही वाहने भंगार अवस्थेत घराबाहेर अथवा रस्त्यावर सोडून देतात. या समस्येकडे पोलिस व महापालिका प्रशासन गांर्भियाने पाहत नसल्याचे दिसून येत आहे. 

एखादी दहशवादी घटना घडली की झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग येते आणि कारवाईचा बडगा उचलला जातो तो ही तात्पुरताच. त्यामुळे कधीकाळी एखाद्या गंभीर घटनेला सामोरे जावे लागू शकते, याचे गांभीर्य संबंधितांनी बाळगणे आवश्यक आहे.

 

Tags : pune, pune news, scrap vehicle, problem,