Mon, Apr 22, 2019 02:32होमपेज › Pune › अपुर्‍या मनुष्यबळामुळे ‘एफडीए’ त्रस्त

अपुर्‍या मनुष्यबळामुळे ‘एफडीए’ त्रस्त

Published On: Jul 01 2018 2:15AM | Last Updated: Jul 01 2018 1:09AMपिंपरी : पूनम पाटील 

दिवसेंदिवस विकासाकडे झेपावत असलेल्या औद्योगिक नगरीतील अन्न-औषध प्रशासन विभागाला मनुष्यबळाची समस्या भेडसावत असून, कारवाईअभावी शहरात उघड्यावर अन्नपदार्थ विकणार्‍यांचे पेव वाढले आहे. केवळ सहाच अन्न निरीक्षक असल्याने नागरिकांच्या तक्रारी सोडवणे, खाद्यपदार्थांचे नमुने तपासणे यांसह नोटिसा पाठवण्यासारखी सगळीच कामे या कर्मचार्‍यांना करावी लागत आहे. ही कामे करताना अन्न व औषध प्रशासनाची दमछाक होत आहे.  

शहरात दिवसेंदिवस उघड्यावर खाद्यपदार्थ विकणार्‍यांची संख्या वाढत आहे.  कारवाईअभावी रोजच नवीन विक्रेता तयार होत असून नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता उघड्यावरच खाद्य पदार्थांची विक्री करण्यात येत आहे.  अन्न-औषध प्रशासन विभागावर नियमित अन्नपदार्थांची तपासणी करणे, पदार्थांचे नमुने खराब आढळल्यास संबंधितांवर कारवाई करणे तसेच हॉटेलांची तपासणी यांसह अन्न व्यावसायिकांना परवाने देणे अशा विविध जबाबदार्‍या आहेत. परंतु, उपलब्ध मनुष्यबळात काम करणे अवघड झाले आहे. 

पालिका क्षेत्रात केवळ सहाच अन्न निरीक्षक आहेत. त्यांच्यावरच शहराची भिस्त आहे. कोणत्याही भागातून तक्रार आल्यास त्यांना त्वरीत पावले उचलावी लागतात. मात्र, मनुष्यबळाअभावी प्रत्येक ठिकाणी पोहचणे अवघड असल्याची कैफीयत अधिकार्‍यांनी मांडली. यामुळे  मनुष्यबळाची पुर्तता व्हायला हवी अशी अपेक्षा कर्मचार्‍यांनी व्यक्त केली आहे.

पावसाळ्यात अस्वच्छ ठिकाणी पदार्थांची विक्री

सध्या  पावसाळा असल्याने नागरिकांची चमचमीत पदार्थ खाण्यासाठी फूडस्टॉलवर गर्दी होत आहे. मात्र, हे खाद्यपदार्थ अस्वच्छ जागेत बनवण्यात येत असून झाकून न  ठेवता विक्री केली जाते. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसून दिवसेंदिवस हे प्रमाण वाढले आहे. यामुळे उघड्यावरील खाद्यपदार्थांवर  माशा बसत आहे.त्यातच अस्वच्छ पाणी व निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या प्रकारांना आळा बसावा अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. 

शहराची लोकसंख्या पाहता अन्न व औषध प्रशासनाकडे केवळ सहाच कर्मचारी आहेत. पंचवीस लाख लोकसंख्या असणार्‍या या शहरात सहा कर्मचारी ‘डोअर टू डोअर’ पोहचू शकत नाही. मनुष्यबळाची कमतरता असल्याने प्रत्येक भागात जाऊन कारवाई करणे अशक्य आहे. यासाठी फेरीवाला संघटनांच्या माध्यमातून फेरीवाल्यांना प्रशिक्षित करण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला. यावर्षी जानेवारी 2018 मध्ये चिंचवडला खाद्यपदार्थांची विक्री करणारे तसेच फेरीवाले यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. परवानाविषयक व सर्वच बाबींबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या सर्व गोष्टींचा फायदा व्हायला हवा होता. परंतु, केवळ अपुर्‍या मनुष्यबळामुळे कारवाईस मर्यादा येत आहेत.                                -संजय नारागुडे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन