Wed, May 22, 2019 15:22होमपेज › Pune › लोहगावात आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर

लोहगावात आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 18 2018 11:03PMयेरवडा : उदय पोवार

11 गावांसोबत लोहगावचा पुणे महापालिकेत समावेश झाला; मात्र अद्याप लोहगावात विकास कामे सुरू झालेली नाहीत. रस्ते, पाणी, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य  अशा नागरी समस्या लोहगावकरांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत.कोट्यावधींचा कर महापालिकेला लोहगावातून मिळणार असला तरी त्यामानाने महापालिकेने नागरी सुविधा सोडविणे सुरू केलेले नाही. लोहगावातील सद्यस्थितीला कामकाज नगर रस्ता सहाय्यक महापालिका आयुक्त कार्यालयामार्फत पहाण्यात येत आहे. 

लोहगावचे क्षेत्रफळ 13 कि.मी. आहे. 2011 च्या जनगणनेनुसार लोहगावची लोकसंख्या 32 हजार 857 इतकी आहे. तर नमुना 8 प्रमाणे 5018 मिळकती आहेत. ग्रामपंचायत असताना एकूण 2 कोटी 40 लाख 15 हजार 662 रूपये इतकी कर मागणी होती. रोज सुमारे 25 टन कचरा जमा होत असून त्यातील 70 टक्के कचरा वेगवेगळा करण्यात येतो. व 30 टक्के मिश्र स्वरूपाचा असल्याने सदरचा कचरा येरवडा रॅम्प येथे पाठविण्यात येतो. या अगोदर हा कचरा हरणतळे याठिकाणी टाकण्यात येत होता. 

परंतु स्थानिक नागरिकांनी हरणतळे येथे कचरा टाकण्यास विरोध केल्याने हा सुका कचरा हडपसरला व ओला कचरा येरवडा रॅम्प याठिकाणी टाकण्यात येतो. सदर कचरा उचलण्याकरिता 5 टेम्पो व 1 टिपर उपलब्ध आहेत. याचबरोबर पुनावाला फाउंडेशनतर्फे देखील टेम्पो उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दैनंदिन स्वच्छतेकरिता एकूण 39 सेवक कार्यरत आहेत. लोहगावमध्ये ड्रेनेजचे एकूण 929 गोल चेंबर व 118 चौकोंनी चेंबर आहेत. एकूण 1047  चेंबर्स आहेत. लोहगावात एकूण 483 झाडण हद्दी असून रोज 18 सेवकांमार्फत 36 हद्दीमधील दैनंदिन झाडणकाम केले जाते. उर्वरित शिल्लक 447 पडीक हद्दी झाडण करण्याकरिता 2 हद्दीकरिता 1 सेवक याप्रकाणे झाडण कामाकरिता अतिरिक्त 223 सेवकांची आवश्यकता आहे. घंटागाडीवर 10 सवेक, क्रॉनिक स्पॉट सफाईकरिता 30 सेवक, ड्रेनेज चेंबर सफाई करिता 15 सेवक, घनकचरा वर्गीकरण करता 25 असे एकूण 80 सेवक मिळूण एकूण 303 सेवकांची दैनंदिन स्वच्छतेकरिता अतिरिक्त सेवकांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी मुख्य खात्याकडून लोहगाव करिता 40 सेवक कंत्राटी पध्दतीने घेण्यास मान्यता मिळाली आहे. तसेच कचरा व्यवस्थापनाकरिता 3.8 क्षमतेचे 25 कंटेनर, 2 बी.आर.सी, 3 डी.पी., 2 घंटागाड्या व 2 कॉम्पॅक्टर गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. तसेच 1 हॉटेल गाडी व 1 जे.सी.बी. ची आवश्यकता आहे. 

सध्या पावसाळयाचे दिवस सुरू आहेत. लोहगावात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी डेंग्यू, मलेरिया अशा साथीचे आजार फैलावणार्‍या डासांची उत्पत्ती होते. याचबरोबर परिसरात साथीचे आजार असलेले रूग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. महापालिकेने साथीच्या आजरांचे सर्व्हेक्षण करून लोहगावात सर्वत्र औषध फवारणी करावी, औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.