Wed, Aug 21, 2019 02:52होमपेज › Pune › हेमू कलानी पुतळ्याचा वनवास संपणार

हेमू कलानी पुतळ्याचा वनवास संपणार

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 17 2018 12:22AMपिंपरी ः नंदकुमार सातुर्डेकर

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शहीद हेमू कलानी यांच्या पुतळ्याचा वनवास 18 वर्षांनी संपण्याची चिन्हे आहेत. पिंपरी कॅम्प येथील हेमू कलानी उद्यानामध्ये शहीद हेमू कलानी यांचा अर्ध पुतळा सुशोभीकरण करून बसविण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन उद्या गुरुवार  (दि. 17) रोजी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे.

हेमू कलानी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक तरुण क्रांतिकारी होते. त्यांचा जन्म सिंधमधील सख्खर येथे 23 मार्च 1923 रोजी झाला. किशोरवयातच त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत उडी घेतली. विदेशी मालावर बहिष्कार व स्वदेशीचा पुरस्कार केला. सन 1942 मध्ये महात्मा गांधी यांच्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. याच दरम्यान, इंग्रज सेनेची शस्त्रांनी भरलेली रेल्वे रोहडी शहरातून जाणार असल्याचे समजताच हेमुने आपल्या साथीदारांसमवेत रेल्वे रूळ उखडून टाकण्याची योजना तयार केली, मात्र पोलिसांनी हेमुला अटक केली.

त्याचे साथीदार पसार झाले. हेमुला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. त्यावेळी सिंधमधील मान्यवरांनी हेमूची  फाशी  रद्द व्हावी, यासाठी अपील केले. व्हाईसरॉयने हेमूने त्याच्या साथीदारांची नावे, त्यांचे पत्ते सांगितले तर त्याची शिक्षा माफ करण्याची तयारी दर्शवली. मात्र, हेमूने  नकार दिला .21 जानेवारी 1943 रोजी हेमू कलानी यास फाशी देण्यात आली. ‘इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय’चा जयघोष करत तो हसत हसत फासावर गेला.

पिंपरीत शहीद हेमू कलानी यांचे स्मारक व्हावे यासाठी कै. ज्येष्ठ पत्रकार अजित किशोर, सामाजिक कार्यकर्ते मधू सबनानी, वासू इदनानी आदींनी प्रयत्न केले. सिंधू सेवा संगमने तत्कालीन  महापौर मधुकर पवळे यांच्या काळात सन 2000 मध्ये हेमू कलानी यांचा पुतळा पालिकेकडे सुपूर्द केला. तेव्हापासून पिंपरी कॅम्पातील हेमू कलानी उद्यानात शहीद हेमू कलानी यांचा अर्धपुतळा बसविण्याचे काम रखडले होते. मुंबई येथील कलासंचनालयाच्या मान्यतेअभावी हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर पुतळ्यास कलासंचनालय मुंबई यांनी मान्यता दिल्यानंतर   डिझाईन तयार करण्यात आले. मुख्य वास्तुशास्त्रज्ञ मुंबई यांच्या मान्यतेनंतर  आज पालकमंत्र्यांच्या हस्ते हा पुतळा सुशोभीकरण करून बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. हे काम आता तरी वेगाने व्हावे अशी अपेक्षा आहे.