Wed, Jul 24, 2019 15:09होमपेज › Pune › कारागृहात नेताना पळून गेलेल्या आरोपीला २० वर्षांनंतर अटक

कारागृहात नेताना पळून गेलेल्या आरोपीला २० वर्षांनंतर अटक

Published On: Feb 25 2018 1:16AM | Last Updated: Feb 25 2018 12:28AMपुणे : प्रतिनिधी

न्यायालयीन कामकाज संपवून पोलिस व्ॅहनमधून येरवडा कारागृहात घेऊन जाताना शर्टला आग लागल्याचे भासवून पळालेल्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने वीस वर्षानंतर अटक केली. 1998 साली खडकी परिसरात हा प्रकार घडला होता. त्यावेळी व्हॅनमधील चौदा आरोपी पसार झाले होते. त्यापैकी दहा जणांस अटक केली होती. तर चारजण अद्यापही फरार होते. त्यातील राम यल्लप्पा सोनावळे (वय 54, रा. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन)  या आरोपीला जेरबंद करण्यात आले. 

सोनावळे याला खुनाच्या प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले  होते. 10 सप्टेंबर 1998 रोजी सोनावळे व इतर 13 आरोपींना न्यायालयाच्या कामकाजासाठी पोलिस व्हॅनमधून शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाचे कामकाज झाल्यानंतर पोलिस व्हॅनमधून  14 जणांस परत येरवडा कारागृहात नेण्यात येत होते. खडकी परिसरात पोलिस व्हॅन आल्यानंतर एका आरोपीने शर्टला आग लागून पोलिस व्हॅन पेटल्याचे भासविले. पोलिसांनी व्हॅन थांबविली.

त्यानंतर 14 आरोपी मुळा रोड परिसरातून पसार झाले होते. या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात 10 आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, चार आरोपी फरार होते. दरम्यान गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस हवालदार उमेश काटे व मोहशन येलपले यांना माहिती मिळाली, की वीस वर्षापूर्वी पोलिस व्हॅनमधून फरार झालेला आरोपी हा शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या पार्कींगमध्ये उभा आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक नितीन भोसले पाटील, उपनिरीक्षक दिनेश पाटील,  हर्षल कदम व कर्मचारी तुषार खडके, श्रीकांत वाघवले व त्यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी खडकी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.