Mon, Aug 19, 2019 05:17होमपेज › Pune › ‘स्थायी’ अध्यक्ष निवडीसाठी भाजपचा ‘व्हिप’

‘स्थायी’ अध्यक्ष निवडीसाठी भाजपचा ‘व्हिप’

Published On: Mar 06 2018 2:07AM | Last Updated: Mar 06 2018 2:07AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षाची निवड दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी भाजपची सदस्यसंख्या अपक्ष धरून तब्बल 11 आहे; मात्र मतदानाच्या वेळी दगाफटका होऊ नये म्हणून पक्षाने समितीच्या सदस्यांना ‘व्हिप’ जारी करून पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करण्याची सक्त ताकीद दिली आहे. मत फुटल्यास कारवाईचे संकेत दिले आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोरेश्‍वर भोंडवे यांच्याकडून भाजपच्या नाराज सदस्यांना गोंजारण्यात येत असून, त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू आहे. 

स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी (दि.7) दुपारी बाराला पालिका भवनातील मधुकरराव पवळे सभागृहात होणार आहे. त्या दृष्टीने सत्ताधारी भाजपसह विरोधी राष्ट्रवादीचे उमेदवार मोर्चेबांधणी करीत आहेत. भाजपकडून ममता गायकवाड व राष्ट्रवादीकडून मोरेश्‍वर भोंडवे यांच्यात सरळ लढत होणार आहे. 

समितीमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. त्यात भाजपचे 10, अपक्ष 1 अशी मिळून सत्ताधार्‍यांची 11 सदस्यसंख्या आहे. राष्ट्रवादीचे 4, शिवसेनेचे 1 असे बलाबल आहे. भाजपच्या सदस्यांनी पक्षाचा अधिकृत उमेदवार गायकवाड यांनाच मतदान करण्याचा ‘व्हिप’ पक्षाने काढला आहे. मते फुटू नयेत, यासाठी दक्षता घेतली आहे. त्या दृष्टीने सर्व 11 सदस्यांना पक्षश्रेष्ठींकडून ताकीद देण्यात आली आहे. मते प्रतिस्पर्धी उमेदवारास दिल्यास कारवाईची तंबी दिली गेली आहे. 

दरम्यान, स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामे दिलेले राहुल जाधव व शीतल शिंदे यांच्याशी पक्षश्रेष्ठींनी चर्चा केली असून, त्यांची समजूत काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ते पदावर कायम राहणार असून, पक्षनिष्ठा दाखविणार असल्याचे सांगण्यात आले. 
दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार भोंडवे विरोधक आणि भाजपतील नाराजांना गोंजारण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी प्रसंगी घोडेबाजारही केला जाऊ शकतो.

भाजपतील मात्र मूळ राष्ट्रवादीतील सदस्यांकडून मतांची भोंडवे यांना अपेक्षा आहे. ती मते आपल्याला मिळतील, असा त्यांना विश्‍वास आहे. त्यांच्या नाराजीचा लाभ उठविण्यासाठी त्यांनी हात वर करून मतदान न घेता गुप्तपणे मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. ती मागणी मान्य झाल्यास भाजपचे नाराज सदस्य भोंडवेंच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

दरम्यान, स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या ममता गायकवाड कोणत्याही अडथळ्याविना विराजमान होतात की, भोंडवे काही करिष्मा करून ते पद हिसकावून घेतात, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.